लोकसत्ता विशेष प्रतिनिधी
नाशिक : महानगरपालिकेची सिटीलिंक बस सेवा हंगामी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे शुक्रवारी सकाळपासून पुन्हा एकदा विस्कळीत झाली. हजारो पासधारक विद्यार्थी व सामान्य प्रवासी वेठीस धरले गेले. तपोवन आगाराच्या १५० बसेस पूर्णत बंद असून नाशिकरोड आगारातील ९७ बसगाड्यांमार्फत सेवा देण्याचा प्रयत्न सिटीलिंक प्रशासन करीत आहे. सिटीलिंकच्या हंगामी कर्मचाऱ्यांनी थकीत वेतन व अन्य कारणांवरून पावणेदोन वर्षात नऊ वेळा कामबंद आंदोलन पुकारले आणि आजतागायत २२ दिवस बससेवा सेवा बंद पाडली. संबंधितांवर मेस्मांतर्गत कारवाईची तयारी प्रशासनाने केली आहे.
सिटीलिंक बस सेवेत कंत्राटी पध्दतीने वाहक पुरवणाऱ्या ठेकेदार कंपनीतील राजकीय नेत्यांमधील वादामुळे या बससेवेला प्रारंभापासून ग्रहण लागले आहे. हंगामी कर्मचाऱ्यांच्या थकीत वेतनाचा मुद्दा वारंवार सेवा ठप्प होण्याचे कारण ठरला. वाहक पुरवण्याचा ठेका लवकरच संपुष्टात येत आहे. नव्या ठेक्याची निविदा प्रक्रिया अंतीम टप्प्यात आहे. या ठेक्यावर आपले वर्चस्व ठेवण्यावरून दोन राजकीय नेत्यांमधील वादाची परिणती कर्मचाऱ्यांच्या आंदोलनात झाल्याची चर्चा मनपा वर्तुळात होत आहे. शुक्रवारी सकाळपासून तपोवन आगारातील वाहकांनी कामबंद आंदोलन पुकारले. या आगारातून दीडशे बसगाड्या शहर व परिसरात सेवा देतात. नाशिकरोड आगारातील ९७ बस केवळ सुरू होत्या. तथापि, अनेक मार्गांवरील बससेवा बंद झाल्यामुळे शालेय विद्यार्थी व नोकरदारांचे हाल झाले. बराच काळ थांब्यावर तिष्ठत रहावे लागले. खासगी वाहतुकीचा आधार घेऊन त्यांना मार्गक्रमण करावे लागले.
आणखी वाचा-सरकारी कांदा खरेदी दरात बदल पण, बाजार समितीपेक्षा ते कमीच; नाफेडला कांदा न देण्याचे संघटनेचे आवाहन
मागील तीन दिवसात सिटीलिंकचे दैनंदिन उत्पन्न २५ लाखाच्या पुढे गेले होते. उत्पन्न वाढत असताना हंगामी कर्मचाऱ्यांनी सेवा बंद पाडून त्यावर पाणी फेरले. अलीकडेच शाळा, महाविद्यालये सुरू झाली. अल्पावधीत २० हजार विद्यार्थ्यांनी पास काढले. सिटीलिंक बस सेवेतून दररोज एकूण ८० ते ९० हजार प्रवासी प्रवास करतात. विद्यार्थ्यांसह त्यांना अडचणींना तोंड द्यावे लागले. सिटीलिंक प्रशासनाने नाशिकरोड विभागातील १५ ते २० बसेस शहरातील मार्गांवर वळवल्या. परंतु, त्याने दीडशे बसगाड्यांची कसर भरून निघणे अवघड होते.
मेस्मांतर्गत कारवाई
जुलै २०२१ मध्ये सिटीलिंक सेवा सुरू झाली होती. तेव्हापासून आजतागायत हंगामी कर्मचाऱ्यांनी नऊ वेळा कामबंद करीत २२ दिवस बससेवा बंद पाडलेली आहे. संबंधितांच्या कार्यपध्दतीमुळे वाहकांवर मेस्मा अंतर्गत कारवाई केली जाणार असल्याचे प्रशासनाने म्हटले आहे.