नाशिक – महानगरपालिकेची सिटीलिंक बस सेवा कर्मचाऱ्यांनी पुकारलेल्या संपामुळे शनिवारी सकाळपासून पुन्हा एकदा ठप्प झाली. याआधी हंगामी कर्मचाऱ्यांनी पावणेदोन वर्षात १० वेळा काम बंद आंदोलन करुन सुमारे २५ ते ३० दिवस बस वाहतूक बंद पाडली आहे. आता पगार वाढीसाठी चालक संपात उतरल्याने हजारो पासधारक विद्यार्थी व सामान्य प्रवासी पुन्हा वेठीस धरले गेले. सिटीलिंक बससेवा वारंवार खंडित होण्यामागे वाहक ठेकेदारीचा राजकीय वादही कारक ठरल्याचे सांगितले जाते.
मनसे कामगार सेनेने या संपाची घोषणा केल्याने सकाळपासून तपोवन, नाशिकरोड आगारातून एकही बस बाहेर पडली नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांसह नागरिकांचे अतोनात हाल झाले. सिटीलिंक बस सेवेला चालक-वाहक पुरवणाऱ्या ठेकेदार कंपनीतील राजकीय नेत्यांमधील वादामुळे प्रारंभापासून ग्रहण लागले आहे. हंगामी कर्मचाऱ्यांच्या थकीत वेतनाचा मुद्दा वारंवार सेवा ठप्प होण्याचे कारण ठरला होता. सिटीलिंक प्रशासनाने अलीकडेच वाहक पुरवण्याचा ठेका नवीन ठेकेदाराला दिल्यामुळे बससेवा सुरळीत राहण्याची अपेक्षाही फोल ठरली. आता बस चालकांनी वेतनवाढीच्या मुद्यावरून संप पुकारला. तपोवन व नाशिकरोड आगारातून एकही बस बाहेर पडली नाही. या सेवेत सुमारे २५० गाड्या असून दैनंदिन ८० ते ९० हजार प्रवासी प्रवास करतात. सिटीलिंकचे दैनंदिन उत्पन्न २५ लाखांच्या पुढे आहे. शहर व ग्रामीण भागातील बससेवा पूर्णत: ठप्प झाली. या संपाची कोणतीही माहिती नसल्याने विद्यार्थी, नोकरदारांना बराच काळ थांब्यावर तिष्ठत राहावे लागले. अखेरीस खासगी वाहतुकीचा आधार घेऊन मार्गक्रमण करावे लागले.
हेही वाचा – Video: नाशिकमध्ये मिरवणुकीने स्वागत होणारा सराईत गुन्हेगार पुन्हा कारागृहात
हेही वाचा – नाशिकमध्ये डेंग्यू चाचण्यांसाठी संचांची टंचाई, आरोग्य विभागाची महापालिकेला तंबी
बससेवा सुरळीत करण्यासाठी सिटीलिंक प्रशासनाकडून मनसे कामगार संघटनेचे प्रमुख अंकुश पवार यांच्याशी चर्चा सुरू केली असली तरी दुपारपर्यंत कुठलाही तोडगा निघू शकला नाही. सिटीलिंक बस चालकांना अतिशय कमी वेतन दिले जाते. त्यांना पाच हजार रुपये वेतनवाढ देण्याचा आग्रह संघटनेकडून धरला जात आहे. चालकांना शासकीय नियमानुसार वेतन दिले जाते, याकडे प्रशासन लक्ष वेधत आहे. सिटीलिंकच्या हंगामी कर्मचाऱ्यांनी थकीत वेतन व अन्य कारणांवरून पावणेदोन वर्षात नऊ वेळा कामबंद आंदोलन पुकारले आणि आजतागायत २२ दिवस बससेवा सेवा बंद पाडली. गेल्या महिन्यात वाहकांनी काम बंद करून बससेवा बंद पाडली होती. तेव्हा प्रशासनाने मेस्मांतर्गत कारवाईची तयारी करीत पोलिसात तक्रार दिली होती. त्यानंतर वाहक कामावर हजर झाले होते.