नाशिक – त्र्यंबक राजाच्या दर्शनासाठी देशभरातून येणाऱ्या भाविकांना सामोरे जाव्या लागणाऱ्या अडचणींवर प्रकाशझोत पडल्यानंतर नगरपालिकेने संबंधितांची आर्थिक पिळवणूक होण्यास हातभार लावणाऱ्या खासगी जागांवरील ११ अनधिकृत वाहनतळांवर कारवाईची तयारी केली आहे. दर्शनासाठी आलेल्या भाविकांची वाहन प्रवेश शुल्कापासून वाहनतळ, देणगी दर्शन, प्रसाधनगृह आदी व्यवस्थेत आर्थिक पिळवणूक होत असल्याची तक्रार गुजरातमधील भाविक कांजीभाई भरवाड यांनी जिल्हा प्रशासनाकडे केली. यासंदर्भात ‘लोकसत्ता’ने प्रकाशझोत टाकल्यानंतर नगरपालिकेने अनधिकृत वाहनतळांवर कारवाईची तयारी चालविली आहे.

या ठिकाणी नगरपालिकेचे वाहनतळ आहे. त्यांची सुमारे ५०० वाहने उभी करता येतील इतकी क्षमता आहे. या ठिकाणी वाहनधारकांना प्रति वाहन आणि कालावधीनुसार ३० रुपये, ५० आणि ७० रुपये आकारले जातात. त्र्यंबकेश्वरसारख्या लहानशा शहरात खासगी जागांवर ११ अनधिकृत वाहनतळ कार्यरत आहेत. संबंधित जागेवर वाहनतळाची परवानगी नाही. या ठिकाणी भाविकांची वाहने उभी केली जातात. एकेका वाहनधारकाकडून ३०० ते ५०० रुपये घेतले जातात, अशा तक्रारी होत आहेत.

त्र्यंबकेश्वरमध्ये दिवसभरात शेकडो वाहने येतात. नगरपालिकेच्या वाहनतळाची क्षमता तुलनेत कमी आहे. ज्या खासगी जागेवर वाहने उभी करण्यास परवानगी नाही, त्यांचा अनधिकृतपणे वाहनतळ म्हणून वापर केला जातो. अन्य पर्याय नसल्याने भाविक खासगी वाहनतळाच्या सापळ्यात अडकतात, असे एकंदर चित्र आहे. या पार्श्वभूमीवर, त्र्यंबकेश्वर नगरपालिकेने खासगी जागांवरील अनधिकृत वाहनतळे बंद करण्यासाठी कारवाईची तयारी केली आहे.

त्र्यंबकेश्वर शहरात नगरपालिकेचे बहुमजली वाहनतळ आहे. तिथे प्रति वाहन ३०, ५० आणि ७० रुपये शुल्क आकारले जाते. शहरात परवानगी नसलेल्या खासगी जागांवर ११ अनधिकृत वाहनतळ कार्यरत आहेत. ही वाहनतळे बंद करण्यासाठी कारवाई केली जाणार आहे. – श्रेया देवचक्के (मुख्याधिकारी, त्र्यंबकेश्वर नगरपालिका)