मनमाड : Manmad Bazar Committee Election suhas kande मनमाड येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीला गालबोट लागले. उमेदवारी अर्ज माघारीच्या अखेरच्या दिवशी बाजार समितीच्या सभागृहात निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. सिध्दार्थ मोरे आणि पोलिसांसमोरच दोन गटात हाणामारी झाली. शिवसेनेचे आमदार सुहास कांदे यांचा गट आणि उध्दव ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख गणेश धात्रक यांच्या गटात ही हाणामारी झाली.
गुरुवारी अर्ज माघारीच्या दिवशी बाजार समिती प्रांगणात गर्दी उसळली होती. निवडणूक अधिकारी डॉ. सिध्दार्थ मोरे यांच्या उपस्थितीत माघारीची प्रक्रिया सुरू होती. एका उमेदवाराने दोन ठिकाणी अर्ज भरला होता. तो बाहेरगावी असल्याने त्याला माघारीसाठी येता आले नाही. या माघारीबाबत उमेदवाराशी दृकश्राव्य माध्यमातून संपर्क साधला गेला. परंतु, ते ग्राह्य धरण्यात आले नाही. त्यामुळे त्याच्यावतीने त्याची मुलगी आणि अनुमोदक, सूचक माघारीसाठी सभागृहात पाठविण्यात आले होते. यावर आक्षेप घेत माघारीचा अर्ज स्विकारू नये यावरून परस्परांकडे रागाने पाहिल्याचे कारण पुढे करत दोन गटात बाचाबाची झाली.
हेही वाचा >>> सांगली बाजार समितीसाठी महाविकास आघाडी- भाजप यांच्यात लढत
काळी वेळातच त्याचे रुपांतर हाणामारीत झाले. दोन्ही गट एकमेकांना भिडल्याने चांगलाच गोंधळ उडाला. निवडणूक अधिकारी डॉ. मोरे यांच्या समोर टेबलवर चढून हाणामारी झाली. पोलीस निरीक्षक बाळासाहेब थोरात यांनी मध्यस्ती करीत वाद आटोक्यात आणला. त्यानंतर अर्ज माघारीची प्रक्रिया पूर्ण झाली. यावेळी चंद्रकांत गोगड, गंगाधर बिडगर, गणेश धात्रक, पिंटू नाईक, माधव शेलार, युवा सेनेचे जिल्हाप्रमुख फरहान खान, शिंदे गटाचे जिल्हाप्रमुख किरण देवरे, योगेश पाटील, साईनाथ गिडगे, मयूर बोरसे आदींसह शेतकरी व कार्यकर्ते उपस्थित होते. या घटनाक्रमातून निवडणूक अत्यंत चुरशीची होण्याची चिन्हे दिसू लागली आहे.
अटीतटीची लढत
मनमाड बाजार समितीच्या १८ जागांसाठी १२५ उमेदवारांनी अर्ज भरले. माघारीच्या दिवशी ८४ उमेदवारांनी रिंगणातून माघार घेतली असून आता १८ जागा आणि ४१ उमेदवार अशी अटीतटीची लढत होणार आहे. विद्यमान आमदार सुहास कांदे यांनी बाजार समितीचे काही माजी सभापती आणि संचालकांसह तुल्यबळ उमेदवार उभे केले आहेत. त्यांच्या विरोधात महाविकास आघाडीचे माजी आमदार राजेंद्र देशमुख, जगन्नाथ धात्रक, अनिल आहेर, संजय पवार, पंकज भुजबळ आणि ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख गणेश धात्रक अशी तुल्यबळ लढत होणार आहे.