नाशिक शहरातील चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित झालेल्या हर हर महादेव या चित्रपटाचा शो राजकीय पातळीवरून विरोध होऊ लागल्याने थांबविण्यात आला. हा चित्रपट पुन्हा दाखवू नये, असा इशारा युवक राष्ट्रवादीने दिला आहे. दुसरीकडे मनसेने चित्रपट पुन्हा न दाखविल्यास आंदोलन छेडण्याचा इशारा दिल्यामुळे राष्ट्रवादी-मनसेत नवा संघर्ष सुरू झाला आहे.
छत्रपती शिवाजी महाराज हे महाराष्ट्राचे आराध्य दैवत असून त्यांच्या बाबतीत चुकीचा इतिहास या चित्रपटातून दाखविण्यात आल्याची तक्रार युवक राष्ट्रवादी काँग्रेसने केली आहे. असे प्रकार कदापि सहन केले जाणार नाहीत. त्यामुळे चित्रपट पुन्हा दाखवू नये, असा इशारा राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष रंजन ठाकरे आणि राष्ट्रवादी युवक काँँग्रेसचे शहराध्यक्ष अंबादास खैरे यांनी चित्रपटगृह चालकांना दिला. यावेळी महिला शहराध्यक्षा अनिता भामरे, संजय खैरनार, धनंजय निकाळे, किशोर शिरसाठ यांसह कार्यकर्ते उपस्थित होते.
हेही वाचा- नाशिकमधील सिडको प्रशासकीय कार्यालय बंद करण्यावरुन शिंदे गट-भाजपमध्ये मतभेद
राष्ट्रवादीने चित्रपटास विरोध केला असताना मनसेचे जिल्हाध्यक्ष अंकुश पवार यांच्या नेतृत्वाखाली कार्यकर्त्यांनी उंटवाडी रस्त्यावरील मल्टिप्लेक्सवर धडक दिली. हर हर महादेवचा थांबविलेला शो तात्काळ सुरू करण्याची मागणी केली. मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचा आवाज लाभलेला हा चित्रपट आहे. अर्धवट माहितीच्या आधारे मराठी चित्रपट बंद करणारी राजकीय मंडळी मराठी चित्रपटसृष्टीच्या मुळावर उठल्याचा आरोप मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी केला. चित्रपट तात्काळ सुरू न केल्यास मनसे चित्रपट सेनेमार्फत आंदोलन करण्याचा इशारा दिला गेला. व्यवस्थापनाने सायंकाळपर्यंत चित्रपट पुन्हा दाखविण्याचे आश्वासन दिल्याचे अंकुश पवार यांनी सांगितले.