कौटुंबिक वादातून दाखल खावटीच्या खटल्यावेळी न्यायमंदिर आवारात पती-पत्नीमध्ये पुन्हा वाद झाल्याने दोन्ही कुटुंबांमध्ये हाणामारी झाली. त्यात पती जखमी झाला. शहरातील शनिपेठ परिसरातील शिरीनबी यांचा विवाह फातेमानगर परिसरातील सय्यद अफसर सय्यद अख्तर यांच्याशी झाला आहे. कौटुंबिक वादातून गेल्या सहा वर्षांपासून दोघेही विभक्त राहत आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

शिरीनबी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पती अफसरसह त्याच्या कुटुंबियांवर कौटुंबिक हिंसाचाराचा गुन्हा दाखल झाला आहे. खावटीची मागणी केली असता, ती मान्य झाली आहे. शिरीनबीच्या म्हणण्यानुसार, अफसर हा बुधवारी न्यायालयात हजर झाला. त्याने न्यायालयाच्या बाहेरच पत्नीसह तिच्या कुटुंबियांना शिवीगाळ करीत बेदम मारहाण केली. अफसर याने सांगितल्यानुसार, न्यायालयात हजर झाल्यानंतर पत्नी शिरीनबीसह तिच्या कुटुंबियांनी बाहेरून पंधरा ते वीस गुंड बोलावून घेत लाठ्याकाठ्यांनी बेदम मारहाण केली. ठार मारण्याचा प्रयत्न केला. पत्नीस नांदवण्यास तयार असनूही असा प्रकार घडल्याचे त्याने सांगितले.

हेही वाचा: जळगाव: अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याप्रकरणी तरुणाला चार वर्षे सक्तमजुरी

बुधवारी अफसर हा तारखेवर न्यायमंदिरात आला होता. त्यावेळी पती-पत्नी यांच्यासह दोन्ही कुटुंबियांमध्ये हाणामारी झाली. यावेळी उपस्थित पोलीस कर्मचार्‍यांनी धाव घेतली. हाणामारीत पती गंभीर जखमी झाला असून, त्याला जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दरम्यान, घटना घडल्यानंतर दोन्ही कुटुंबीय एकमेकांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यासाठी शहर पोलीस ठाण्यात गेले. तेथेही गोंधळ उडाला होता. दोन्ही कुटुंबियांतर्फे रात्री उशिरा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

Nashik News (नाशिक न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Clash between separated husband and wife inside court premises husband seriously injured in jalgaon tmb 01