लोकसत्ता विशेष प्रतिनिधी
नाशिक : गोदा महाआरतीवरून पुरोहित संघ आणि रामतीर्थ गोदावरी सेवा समिती यांच्यातील संघर्ष शिगेला पोहोचला आहे. पंचवटी ग्रामसभेत गोदा आरती समिती बेकायदेशीर ठरवत पुरोहित संघाच्या दोन सदस्यांनी राजीनामा दिला. दुसरीकडे, हे सदस्य वगळता रामतीर्थ गोदावरी सेवा समिती एकसंघ असल्याचा दावा केला जात आहे. या वादात आता अखिल भारतीय तीर्थ पुरोहित महासभाही उतरली आहे. हरिद्वार, वाराणसी, प्रयागराज आदी तीर्थावर तीर्थ पुरोहित संस्थांकडून आरती केली जाते. गंगा गोदावरी पुरोहित संघ सदैव गोदावरीची आरती करत असून नवी समिती स्थापून पुरोहित संघाच्या कार्यात अडथळे आणणे योग्य नसल्याचे महासभेने शासन, प्रशासनाला पाठवलेल्या पत्रात सूचित केले आहे.
वाराणसी, हरिद्वारच्या धर्तीवर, गोदा आरतीला भव्य स्वरुप देण्यासाठी राज्य सरकारने कोट्यवधींचा निधी देण्याची तयारी दर्शविली आहे. या आरतीच्या नेतृत्वावरून रामतीर्थ गोदावरी समिती आणि पुरोहित संघात बेबनाव झाला आहे. या घटनाक्रमात ग्रामसभेत रामतीर्थ गोदावरी सेवा समिती बेकायदेशीर असल्याचा ठपका ठेवण्यात आला. ही समिती रद्द करावी आणि गोदा महाआरतीचा अधिकार पुरोहित संघाकडे ठेवण्याचा ठराव करण्यात आला. त्यानंतर सेवा समितीचे सदस्य प्रतिक शुक्ल, चंद्रशेखर पंचाक्षरी यांनी राजीनामे दिले. रामतीर्थ सेवा समिती ही शासकीय समिती असल्याचा संभ्रम पसरवला गेला. शासनाने ती स्थापन केलेली नाही, असा दावा पुरोहित संघाचे अध्यक्ष सतीश शुक्ल यांनी केला. राजीनामा देतानाही सदस्यांनी गोदा आरतीचा विषय ज्या प्रकारे हाताळला जात आहे, तो अन्यायपूर्ण असल्याचे म्हटले आहे. जेव्हा कुणीही नव्हते, तेव्हापासून पुरोहित संघ गोदा आरतीची जबाबदारी श्रध्देने व स्वखर्चाने पार पाडत आहे. तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी पुरोहित संघाने आरती करावी, असा कौल दिला आहे. परंतु, ज्यांनी आयुष्यात कधीही गोदा आरतीसाठी रामकुंडावर ना उपस्थिती लावली, ना कधी साधी फुलवात लावली, ते आता गोदा आरतीवर दावा करत असल्याकडे प्रतिक शुक्ल यांनी लक्ष वेधले. रामकुंडावरील गोदावरी मातेची आरती हा पुरोहित संघासाठी निव्वळ श्रद्धेचा, भक्तीचा आणि गोदामाईचा प्रति कृतज्ञता व्यक्त करण्याचा विधी आहे. मात्र त्याला बाजारू स्वरूप आणण्याचे काम समितीच्या अध्यक्षांकडून होत असल्याचा आक्षेप नोंदवला गेला.
या वादात अखिल भारतीय तीर्थ पुरोहित महासभेने शासन व प्रशासनाला पत्र पाठवत गोदा आरतीचा परंपरागत अधिकार गंगा गोदावरी पुरोहित संघाचा असल्याकडे लक्ष वेधले आहे. गोदा आरतीसाठी अलीकडेच काही व्यक्तींनी स्थापलेल्या समितीकडून पुरोहित संघाच्या पूजन, आरतीवर प्रभाव टाकण्याचा प्रयत्न केला जात असून तो अनुचित असल्याचे महासभेने म्हटले आहे. सर्व तीर्थांवर परंपरागत तीर्थ पुरोहित संस्थांकडून आरती केली जाते. त्यामुळे गोदा आरतीबाबत योग्य निर्णय घेण्याची मागणी अखिल भारतीय तीर्थ पुरोहित महासभेचे महामंत्री पंडित कन्हैया त्रिपाठी यांनी केली आहे.
दोन सदस्यांनी राजीनामे दिले असले तरी रामतीर्थ गोदावरी सेवा समितीत फूट पडलेली नाही. ती एकसंघ आहे. समितीतील उर्वरित सदस्यांची एकसमान भूमिका आहे. गोदा आरतीच्या संदर्भात जे विषय चर्चिले जात आहेत, त्यासंबंधीच्या प्रश्नांची उत्तरे बुधवारी दिली जातील. सेवा समितीत आजही आपणासह पुरोहित संघाचे चार सदस्य आहेत. -जयंत गायधनी (अध्यक्ष, रामतीर्थ गोदावरी सेवा समिती)
आणखी वाचा-नाशिक : शहरातील चार स्थानकांतून बससेवेचे नियोजन
वाद केव्हा मिटेल ?
नाशिक येथे वाराणसी, हरिद्वारच्या धर्तीवर, गोदा आरतीला भव्य स्वरुप देण्यासाठी राज्य सरकारने कोट्यवधींचा निधी देण्याची तयारी दर्शविल्यानंतर आरतीच्या नेतृत्वावरून रामतीर्थ गोदावरी समिती आणि पुरोहित संघात वाद सुरु झाला. ग्रामसभेने रामतीर्थ गोदावरी सेवा समिती बेकायदेशीर असल्याचा ठपका ठेवला. या वादात अखिल भारतीय तीर्थ पुरोहित महासभेने शासन व प्रशासनाला पत्र पाठवत गोदा आरतीचा परंपरागत अधिकार गंगा गोदावरी पुरोहित संघाचा असल्याकडे लक्ष वेधले आहे. त्यामुळे गोदा आरतीनिमित्त उदभवलेला हा धार्मिक वाद कसा सोडवला जातो, याकडे दोन्ही बाजूंचे लक्ष आहे.