नाशिक : नांदगाव मतदारसंघात शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार सुहास कांदे यांनी मतदानाच्या दिवशी बाहेरील शेकडो लोकांना आणल्याचा आरोप होत आहे. अशी वाहने प्रतिस्पर्धी अपक्ष उमेदवार समीर भुजबळ यांनी आपले वाहन रस्त्यात आडवे लावून रोखून धरली. त्यामुळे कांदे व भुजबळांमध्ये वाद होऊन तणावाची स्थिती निर्माण झाली. यावेळी कांदे हे भुजबळांच्या अंगावर धावून गेले. त्यांना जिवे मारण्याची धमकी दिल्याचे प्रत्यक्षदर्शींकडून सांगण्यात आले.

नांदगाव-मनमाड रस्त्यावर हा प्रकार घडला. या रस्त्यावर शिंदे गटाचे उमेदवार सुहास कांदे यांची गुरुकुल शैक्षणिक संस्था आहे. समीर भुजबळ हे या मार्गावरून जात असताना संस्थेत शेकडो लोकांना आणल्याचे दृष्टीपथास पडले. पैसे वाटप करून त्यांना वाहनांमध्ये मतदानासाठी नेले जात होते. हे लक्षात येताच भुजबळांनी रस्त्यात आपले वाहन आडवे लावून संबंधितांची वाहने रोखली. पोलिसांना या घटनेची माहिती दिली. याची माहिती समजताच काही वेळात कांदे हे घटनास्थळी पोहोचले. ते शिवीगाळ करीत समीर भुजबळ यांच्या अंगावर धावून गेले, त्यांना जिवे मारण्याची धमकी दिल्याचे भुजबळांसोबत असणाऱ्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले. शैक्षणिक संकुलात काही तडीपार गुन्हेगार होते. मतदानाच्या दिवशी ही मंडळी मतदारसंघात कशी, असा प्रश्न करण्यात आला. कांदे व भुजबळ समर्थकांमध्ये धक्काबुक्की झाली. पोलिसांसमोर कांदे यांनी भुजबळ समर्थकांना मारहाण केल्याची तक्रार करण्यात आली.

शैक्षणिक संकुलात सुमारे एक हजार ऊसतोड कामगारांना आणण्यात आले आहे. त्यांना खुलेआम पैसे वाटप करून मतदानासाठी पाठविले जात असल्याचा आरोप भुजबळांनी केला. या घटनाक्रमावर राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते छगन भुजबळ यांनी सुहास कादेंवर संपूर्ण यंत्रणा ताब्यात घेतल्याचा आरोप केला आहे. दरम्यान, हे मजूर दुरवरून आल्यामुळे त्यांच्या नाश्ताची व्यवस्था शैक्षणिक संस्थेत करण्यात आली होती, असा दावा कांदे समर्थकांकडून करण्यात आला.