नाशिक –शिक्षण विभागाला भ्रष्टाचाराची किड कशी पोखरत आहे, हे पुन्हा एकदा उघड झाले आहे. शालार्थ सांकेतांक मिळविण्यासाठी शिक्षण अधिकारी कार्यालयात प्रस्ताव पाठविण्यात आला असता ५० हजार रुपयांची लाच मागण्यात आली. बुधवारी ही लाच स्विकारतांना शिक्षण उपसंचालक कार्यालयातील कनिष्ठ लिपिक दिगंबर साळवे याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ताब्यात घेतले.
तक्रारदार हे खासगी शाळेत शिक्षण सेवक म्हणून नोकरीस होते. त्यानंतर शिपाई या पदासाठी त्यांची मान्यता आल्यानंतर ते एक जानेवारी २०२३ पासून आजपर्यंत शाळेत शिपाई पदावर कार्यरत आहेत. त्यांना अद्याप पर्यंत कोणत्याही प्रकारचे वेतन मिळाले नाही. वेतनासाठी आवश्यक असलेला शालार्थ सांकेतांक क्रमांक मिळण्यासाठी त्यांनी शाळेच्या मदतीने शिक्षणाधिकारी कार्यालयात प्रस्ताव पाठविला. हा प्रस्ताव मंजूर करण्यासाठी शिक्षण उपसंचालक कार्यालयातील कनिष्ठ लिपिक साळवेने ५० हजार रुपयांची लाच मागितली. ही लाच शिक्षण उपसंचालक कार्यालयात स्विकारतांना त्यास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ताब्यात घेतले.