जळगाव : रोजच्या वातावरणातील बदलामुळे जिल्ह्यात पिकांवर रोगांचा प्रादुर्भाव वाढत असल्याने रब्बीचा पेरा वाया जाण्याची भीती आहे. धास्तावलेले शेतकरी पीक वाचविण्यासाठी औषधांची फवारणी करत आहेत. एक-दोन दिवसांपासून जिल्ह्यातील अनेक भागांत ढगाळ वातावरण असल्यामुळे रब्बीतील पिकांना फटका बसत आहे. त्यातच रोगराईमुळे औषध फवारणीचा खर्च वाढल्याने बळीराजाची चिंता वाढली आहे.
अतिवृष्टीमुळे खरिपाची पिके हातून गेली असताना त्यातून सावरत शेतकऱ्यांनी रब्बीची पेरणी केली. शेतात ओलावा असल्याने रब्बीसाठी शेती तयार करताना तारेवरची कसरत करावी लागली होती. आता पिके बहरलेली असताना दोन-तीन दिवसांपासून अनेक भागांत ढगाळ हवामानामुळे रब्बी पिकांना फटका बसत आहे. त्यातच रोगराईमुळे औषध फवारणीचा खर्च वाढल्याने बळीराजाची चिंता वाढली आहे.
तूर पिकांवर अळीचा प्रादुर्भाव होण्याचा धोका निर्माण झाला आहे. आधीच बाजारभाव नसल्याने उत्पादनखर्चही निघत नाही. त्यातच औषध फवारणीचा खर्च अधिक येत असल्याने बळीराजा आर्थिक विवंचनेत सापडला आहे.
सध्या राज्यातील वातावरणात सातत्याने बदल होत आहे. कुठे थंडीचा कडाका, तर कुठे ढगाळ वातावरण जाणवत आहे. उत्तरेकडून वाहणाऱ्या थंड वाऱ्यामुळे तापमानात घट होत आहे. अनेक ठिकाणी तापमानाचा पारा १० ते १५ अंश सेल्सिअसच्या दरम्यान आहे. जळगाव जिल्ह्यात तापमानाचा पारा नऊ अंशांवर गेल्याने हुडहुडी वाढली आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार आणखी तीन, चार दिवस गारठ्याचे असतील. गतवर्षीही याच महिन्यात पहिल्याच आठवड्यात थंडीत वाढ झाली होती.