नरेंद्र दाभोलकर यांचा खून झाल्यापासून हे कृत्य सनातन संस्थेसारख्यांकडूनच केले जाऊ शकते, असा दावा आधीपासूनच करण्यात येत होता. पुरोगामी विचारसरणींच्या नेत्यांना संपविण्यासाठी सनातनने मानवी रोबो तयार केल्याचा आरोप अंधश्रद्धा निमूर्लन चळवळीचे संघटक श्याम मानव यांनी केला. त्यानुसार, राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसही सनातनच्या हिटलिस्टवर असल्याचे मत श्याम मानव यांनी पत्रकार परिषदेत मांडले. येथील शासकीय विश्रामगृहात आयोजित पत्रकार परिषदेत मानव यांनी सनातनवर निशाणा साधला.
यावेळी श्याम मानव म्हणाले की, सनातन संस्थेच्या साधकांमध्ये राजकारण, पोलीस, न्याय व्यवस्था हे सर्व दुर्जन असल्याचे बिंबवण्यात आले आहे. त्यामुळे त्यांनी केलेले कृत्य हे खुनासारखे नसून आपण ईश्वरी राज्य निर्माण करण्याच्या दृष्टीने एक पवित्र कार्य केल्याची भावना त्यांच्यात निर्माण होते. डॉ. नरेंद्र दाभोलकर यांची हत्या सनातनकडूनच झाल्याचा दावा त्यावेळी केला होता. कॉ. गोविंद पानसरे आणि डॉ. कलबुर्गी यांच्या हत्याही दाभोलकरांप्रमाणेच करण्यात आल्या. यावरून आम्ही केलेल्या दाव्याची सत्यता समोर आल्याचे मानव म्हणाले. सनातनचे संस्थापक जे. बी. आठवले यांनी संमोहनशास्त्राचा अत्यंत शिस्तबद्ध वापर करून मानवी रोबो तयार केले असून, ते आज समाजातील पुरोगामीवाद्यांचा नाश करण्यासाठी तयार आहेत, असेही ते म्हणाले.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा