नाशिक – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे यांच्या प्रमुख उपस्थितीत येथे रविवारी सिंहस्थ कुंभमेळा आढावा बैठक आणि अन्य कार्यक्रम होण्याची शक्यता आहे. महायुतीतील वादात नाशिकच्या पालकमंत्रीपदाचा तिढा अद्याप सुटलेला नाही. कुंभमेळ्यास अधिक कालावधी शिल्लक नसल्याने पालकमंत्र्यांअभावी कुठलीही कामे रखडू नयेत, यावर भाजपकडून भर दिला जात असल्याचे मानले जाते.

प्रशासनाच्या माहितीनुसार शनिवारी रात्री मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे नाशिक येथील शासकीय विश्रामगृहात मुक्काम करतील. रविवारी मुख्यमंत्री सिंहस्थ कुंभमेळ्याचा आढावा घेण्याच्या शक्यतेने प्रशासकीय यंत्रणा तयारीला लागली आहे. यापूर्वी मुंबईत दोन बैठकांच्या माध्यमातून मुख्यमंत्र्यांनी कुंभमेळा तयारीला वेग दिला आहे. राज्याच्या अर्थसंकल्पात कुंभमेळ्याच्या दृष्टीने जिल्ह्यातील विविध रस्ते कामांसाठी २२७० कोटींची तरतूद करण्यात आली आहे. महापालिकेसह अन्य यंत्रणांनी सांडपाणी प्रक्रिया केंद्र, गोदावरी नदीवरील पूल, घाटांचा विस्तार आदी कामांना गती देण्याच्या दिशेने पावले टाकली आहेत.

सिंहस्थ कुंभमेळ्याची जबाबदारी जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांच्याकडे सोपविली गेली असली तरी नाशिकच्या पालकमंत्रीपदाचा पेच मात्र अद्याप सुटलेला नाही. या पदावर काही महिन्यांपूर्वी महाजन यांच्या नावाची घोषणा झाली असता चोवीस तासात त्यांच्या नावाला स्थगिती द्यावी लागली होती. तेव्हापासून पालकमंत्रीपद रिक्त आहे.

पालकमंत्रीपदावर शिवसेना (एकनाथ शिंदे) अडून बसल्याचे सांगितले जाते. राष्ट्रवादीचे (अजित पवार) जिल्ह्यात सात, भाजचे पाच आणि शिंदे गटाचे दोन आमदार आहेत. सर्वाधिक संख्याबळाच्या आधारावर अजित पवार गटाने आधी हक्क सांगितला होता. कुंभमेळ्यावर आपला प्रभाव राखण्याचा भाजपचा प्रयत्न आहे. त्या अनुषंगाने कुंभमेळ्याचे नियोजन व अंमलबजावणीकडे कटाक्षाने लक्ष दिले जात आहे.

यंग इंडियन्सच्या परिषदेचा मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत समारोप

भारतीय उद्योग महासंघ संचलित यंग इंडियन्स संस्थेच्या नाशिक शाखेतर्फे आयोजित पश्चिम क्षेत्र परिषदेचा समारोप रविवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत होत आहे. भारतीय नेतृत्व, उद्योजकता आणि राष्ट्र उभारणीला प्रोत्साहन देण्यासाठी यंग इंडियन्स संस्थेची स्थापना करण्यात आली आहे. या परिषदेच्या माध्यमातून नामांकित उद्योजकांनी शहर, राष्ट्र तसेच देशाच्या विकासासाठी काय करता येईल, या विषयावर चर्चा केली.

परिषदेत शहर तसेच जिल्हा हा उद्योग वाढीसाठी कसा पोषक आहे, या अनुषंगाने चर्चा झाली. परिषदेत महाराष्ट्र, गोवा, गुजरात, मध्य प्रदेश यांसह २० शहरांमधील उद्योजक, विविध क्षेत्रातील व्यावसायिक सहभागी झाले आहेत. मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत परिषदेचा समारोप होत असून महाराष्ट्रात उद्योगासाठी बाहेरून येणाऱ्यांना काय सुविधा दिल्या जातील, जवाहरलाल नेहरू पोर्ट ॲथोरिटी तसेच वाढवण बंदर या माध्यमातून उपलब्ध होणारी रोजगाराची संधी, हरीत कुंभ या विषयावर भारतीय उद्योग महासंघ तसेच यंग इंडियन्सचे पदाधिकारी आणि मुख्यमंत्री यांच्यात गटचर्चा होणार आहे.

Story img Loader