नाशिक – महायुतीचे कार्यकर्ते निवडणुकीपुरते काम करीत नाहीत. घरी बसून काम करीत नाहीत. फेसबुक लाईव्ह करत नाहीत. आमचे कार्यकर्ते २४ तास काम करणारे व मदतीला धावून जाणारे आहेत. निवडणूक असो वा नसो, ते सतत काम करतात. त्यामुळे नाशिकच्या जागेवर उमेदवारी जाहीर करण्यास उशीर झाला असला तरी हे सर्व लोक एकदिलाने कामाला लागल्याचा दावा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केला.
गुरुवारी महायुतीच्यावतीने नाशिक मतदारसंघात हेमंत गोडसे तर, दिंडोरीत डॉ. भारती पवार यांचे अर्ज शक्तिप्रदर्शन करून दाखल करण्यात आले. प्रचार फेरी जिल्हाधिकारी कार्यालयाजवळ पोहोचल्यानंतर मुख्यमंत्री शिंदे हे दाखल झाले. त्यांच्यासह शिंदे गटाचे प्रवक्ते आमदार संजय शिरसाठ, भाजपचे नेते गिरीश महाजन, राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते छगन भुजबळ आदींच्या प्रमुख उपस्थितीत गोडसे आणि डॉ. पवार यांचे अर्ज भरण्यात आले.
हेही वाचा – प्रचारासाठी कमी अवधी उमेदवारी मिळण्यात हेमंत गोडसे यांच्या पथ्यावर
नाशिकच्या जागेवरून महायुतीत संघर्ष झाला होता. तीनही पक्षांच्या दावेदारीमुळे शिंदे गटाच्या ताब्यातून ही जागा निसटण्याची शक्यता निर्माण झाली होती. परिणामी, महिनाभर उमेदवार जाहीर करता आला नाही. अखेरच्या क्षणी शिंदे गटाने गोडसेंना उमेदवारी दिली. या विलंबामुळे काही अडचणी येतील का, या प्रश्नावर मुख्यमंत्री शिंदे यांनी कडकडीत उन्हात फेरीत सहभागी झालेल्या लोकांचा दाखला देऊन महायुतीचे सर्व लोक कामाला लागल्याचे नमूद केले. छगन भुजबळ हे मंत्रिमंडळातील आमचे सहकारी आहेत. तिकीट वाटप होईपर्यंत प्रत्येक पक्षाची इच्छा असते. एकदा निर्णय झाल्यावर सर्व एकदिलाने काम करतील. आमच्याकडे महाविकास आघाडीसारखे एकेका मतदारसंघात दोन, दोन उमेदवार उभे राहणार नाहीत. गळ्यात गळे व तंगड्यात तंगड्या घालून मविआचे उमेदवार पडणार असल्याचा टोला शिंदे यांनी हाणला.
केंद्रात मोदी सरकारने १० वर्षात केलेले काम आणि राज्यात महायुती सरकारने जनसामान्यांच्या हिताचे जे निर्णय घेतले, त्याची पोचपावती निकालात पहायला मिळेल. नाशिक व दिंडोरी या दोन्ही बालेकिल्ल्यात आमचे उमेदवार विक्रमी मताधिक्याने विजयी होतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. काँग्रेस जे ५० ते ६० वर्षात काम करू शकली नाही, ते काम मोदींनी १० वर्षात केले. मोदी सरकारने सर्व समाजाला बरोबर घेऊन पुढे जाण्याचे ठरविले आहे. काँग्रेसने त्यांचा केवळ एकगठ्ठा मतदार (व्होट बँक) म्हणून वापर केला. सर्व समाजघटक आता आमच्याबरोबर आहेत. ठाणे लोकसभा मतदारसंघात महायुतीत कुठल्याही अडचणी नाहीत. शिवसेनेच्या प्रमुख नेत्यांनी संजीव नाईक यांची भेट घेऊन चर्चा केली आहे. ही निवडणूक एका मतदारसंघासाठी नव्हे तर, मोदींना पंतप्रधान करण्यासाठी असल्याचे त्यांनी नमूद केले.
हेही वाचा – नाशिक : स्थापत्य अभियंता हेमंत गोडसे यांच्यावर पुन्हा शिवसेनेची भिस्त
‘उद्धव ठाकरे यांचे मलाही फोन…’
माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबाबत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जे सांगितले, ते वास्तव आहे. शिवसेना दुभंगल्यानंतर ठाकरे यांनी दिल्लीतील भाजप नेत्यांसह आपणासही फोन केले होते. मुख्यमंत्री बनवतो असेही सांगितले. पण आपण मुख्यमंत्री बनण्यासाठी बाहेर पडण्याचा निर्णय घेतला नव्हता. शिवसेनाप्रमुखांच्या विचारांशी फारकत झाली, मूठमाती दिली, तेव्हा आपण बाहेर पडलो. ठाकरेंनी दिल्लीत फोन करून यांना कशाला घेता, आम्ही सर्व येतो, असे म्हटले होते. परंतु, शिवसेना त्यांच्याकडे राहिली नव्हती. आणखी असे खूप काही आहे, सध्या बोलू इच्छित नाही, असे शिंदे यांनी सांगितले.