दुष्काळात लाभ होण्याविषयी साशंकता

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मुख्यमंत्र्यांच्या नावाने राबविला जाणारा ग्रामीण पेयजल कार्यक्रम जिल्ह्य़ात संथपणे मार्गक्रमण करीत आहे. या कार्यक्रमांतर्गत गेल्या वर्षी मंजूर झालेल्या ३३ पैकी २१ योजना प्रगतिपथावर आहेत. त्यातील ८ डिसेंबरअखेर, तर उर्वरित १३ योजना काही अडचणी न उद्भवल्यास सुरू होण्यास मार्च उजाडणार आहे. अन्य ११ योजनांची निविदा कार्यवाही पूर्ण करून नोव्हेंबरमध्ये कार्यारंभ आदेश देण्याचा प्रयत्न आहे. त्यामुळे दुष्काळात योजनांचा किती लाभ होईल याबाबत साशंकता व्यक्त केली जात आहे.

दुष्काळी स्थितीमुळे यंदा पाण्याचे मोठे दुर्भिक्ष जाणवणार आहे. या परिस्थितीत मुख्यमंत्री ग्रामीण पेयजल कार्यक्रमांतर्गत हाती घेतलेल्या योजना वेळेत पूर्ण झाल्यास त्या त्या भागातील ग्रामस्थांना दिलासा मिळू शकतो. तसा दिलासा किती गावांना मिळेल याबद्दल संभ्रम आहे. या कार्यक्रमांतर्गत २०१७-१८ वर्षांत जिल्ह्य़ातील ११ तालुक्यांत ३०४६ लाख रुपये खर्चाच्या ३३ योजनांना मंजुरी देण्यात आली होती. दीड वर्षांत त्यातील २१ योजनांची कामे सुरू होऊ शकली.

सर्वाधिक योजना असणाऱ्या सिन्नरसह मालेगाव, कळवण आणि बागलाण तालुक्यातील योजनांची भौतिक प्रगती कमी असल्याची बाब खुद्द प्रशासनाने मान्य केली आहे. सध्या दिंडोरी, कळवण, निफाड, येवला तालुक्यात प्रत्येकी एक, इगतपुरी, सुरगाणा तालुक्यात प्रत्येकी दोन तर बागलाण, मालेगाव तालुक्यात प्रत्येकी चार आणि सिन्नर तालुक्यात पाच योजनांची कामे प्रगतिपथावर आहेत. या योजनांमधून पाणीपुरवठा सुरू करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. त्यानुसार डिसेंबर २०१८ मध्ये निफाड, येवला, इगतपुरी, कळवण, सुरगाणा, बागलाण, मालेगाव, सिन्नर तालुक्यातील प्रत्येकी एक योजना सुरू करण्याचे नियोजन आहे. जानेवारी ते मार्च २०१९ या कालावधीत उर्वरित १३ योजना सुरू करण्याचे नियोजन आहे.

पाणीपुरवठा योजनांची मुहूर्तमेढ रोवणारे सहा तालुके शासनाने दुष्काळी म्हणून जाहीर केले आहे. पिण्याच्या पाण्यासाठी टँकरची मागणी वाढत आहे. या स्थितीत उपरोक्त योजना तहानलेल्या गावांची तृष्णा भागवणारी ठरू शकते. ११ योजनांची कामे अद्याप सुरू झालेली नाही. त्यांचा श्रीगणेशा होण्यास बराच कालावधी गेला आहे. त्यातील तीन योजनांची ऑक्टोबर आणि आठ योजनांची कामे नोव्हेंबर १८ मध्ये निविदा कार्यवाही पूर्ण करून कार्यारंभ आदेश देण्याचे नियोजन आहे. या कामांना उन्हाळ्यात सुरुवात होईल. त्या पूर्णत्वास जाण्यास बराच कालावधी लोटणार आहे.

सटाणा, इगतपुरी, चांदवड शहराला दोन वर्षांची प्रतीक्षा

महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान महाअभियानांतर्गत सटाणा, इगतपुरी आणि चांदवड या शहरात योजनांचे काम हाती घेण्यात आले आहे. फेब्रुवारी २०१८ मध्ये मंजूर सटाणा शहर पाणीपुरवठा योजनेची निविदा प्रक्रिया ऑक्टोबर १८ मध्ये पूर्ण होऊन कार्यारंभ आदेश दिला गेला. तिचा पूर्ण होण्याचा संभाव्य कालावधी प्रशासनाने एप्रिल २०२० गृहीत धरला आहे. इगतपुरी पाणीपुरवठा योजनेची स्थिती त्यापेक्षा निराळी आहे. ठेकेदाराशी दर वाटाघाटी करून याबाबत नगरविकास विभागाकडे अहवाल पाठवण्यात आला.  कार्यारंभ आदेश दिल्यानंतर कामासाठी १८ महिने कालावधी आहे. ही योजनाही एप्रिल २०२० मध्ये पूर्ण होईल, अशी शक्यता आहे. चांदवड शहर पाणीपुरवठा योजनेत बँक हमी आणि परवाना शुल्क म्हणून एक कोटी नऊ लाखांची मागणी करण्यात आली आहे. ही रक्कम माफ व्हावी म्हणून पत्रव्यवहार सुरू आहे. ही योजना मे २०१९ मध्ये पूर्ण होण्याचा संभाव्य कालावधी आहे.

Nashik News (नाशिक न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Cm rural drinking water program slowly