पारा ९.४ अंशावर; हंगामातील नीचांकी तापमानाची नोंद

महिनाभरापासून गारव्याची अनुभूती घेणाऱ्या नाशिकमध्ये मंगळवारी हंगामातील ९.४ अंश या नीचांकी तापमानाची नोंद झाली. आता खऱ्या अर्थाने थंडीची लाट आली असून शीत लहरींमुळे तापमान आणखी खाली जाण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. ग्रामीण भाग धुक्याच्या दुलईत लपेटला गेल्याचे पाहावयास मिळत आहे. या वातावरणाचा परिणाम द्राक्ष बागांवर होणार असल्याने उत्पादक धास्तावले आहेत.

यंदा परतीचा पाऊस झाला नाही. यामुळे यंदाची थंडी कशी असणार, याबाबत सर्वसामान्यांकडून आडाखे बांधले जात आहेत. थंडीच्या तीव्रतेविषयी मत-मतांतरे व्यक्त झाली. दिवाळीनंतर गारवा जाणवू लागला. त्यात चढ-उतार सुरू होते. डिसेंबरपासून थंडीने आपले अस्तित्व अधोरेखित करण्यास सुरुवात केली. डिसेंबरच्या प्रारंभी ११.२ अंशांवर असणारे तापमान पुढील काळात पुन्हा दोन-तीन अंशांनी उंचावले होते. सोमवारी १२.८ अंशांवर असणारा पारा मंगळवारी ९.४ पर्यंत खाली उतरला. रात्रीपासून वातावरणात कमालीचा गारवा होता. थंडीचे जोरदार पुनरागमन झाल्याचे जाणवत होते.

सध्या उत्तर भारतात शीत लहर पसरली आहे. त्या भागातून वाहत येणाऱ्या वाऱ्याचा प्रभाव नाशिकच्या वातावरणावर पडत आहे. यामुळे तापमानात लक्षणीय घट होऊन सर्वाना हुडहुडी भरल्याचे चित्र आहे. गारवा असल्याने दिवसभर उबदार कपडे परिधान करणे भाग पडत आहे. ग्रामीण भागात सकाळी दाट धुके पसरले होते. त्यामुळे वाहनधारकांना रस्त्यावरून मार्गक्रमण करताना वाहनांचे दिवे सुरू ठेवावे लागले.

एरवी, जानेवारी किंवा फेब्रुवारीच्या सुमारास नीचांकी पातळीची नोंद होते. यंदा ती डिसेंबरच्या मध्यावर झाली आहे. गेल्या वर्षी ११ डिसेंबर रोजी तापमान १४ अंश होते, तसेच २९ डिसेंबर रोजी ७.६ अंश होते. २५ जानेवारी २०१८ रोजी ७.२ या नीचांकी तापमानाची नोंद झाली होती. २०१६च्या हंगामात ५.५ अंश हे नीचांकी तापमान होते. या वर्षी डिसेंबरच्या मध्यावर तापमान कमी झाले आहे. पुढील काळात त्यात आणखी घट होण्याचा अंदाज हवामानशास्त्र विभागाने वर्तविला आहे.

द्राक्ष उत्पादकांमध्ये धास्ती

यंदा द्राक्षांसाठी हंगाम पोषक आहे. वातावरण चांगले राहिल्याने द्राक्षांची चांगल्या पद्धतीने वाढ झाली. थंडीचा परिणाम एकूणच द्राक्षाच्या विकासावर होईल. हेच वातावरण कायम राहिल्यास द्राक्ष बागांची वाढ संथ होईल. द्राक्षमण्यांना फुगवण मिळणार नाही. परिणामी द्राक्षघडांचे वजन कमी भरते, असे द्राक्ष उत्पादक संघाचे विभागीय अध्यक्ष माणिकराव पाटील यांनी सांगितले. अन्य द्राक्ष उत्पादकांच्या मतेही फुगवणीवर परिणाम होणार असल्याचे सांगितले जाते. ज्यांच्या द्राक्ष मण्यांमध्ये पाणी उतरले, त्यांना तडे जाण्याची भीती आहे.

Story img Loader