महिनाभर आधीच जिल्ह्यत आलेल्या थंडीच्या लाटेचा मुक्काम कायम असून बुधवारी नीचांकी पातळी गाठणाऱ्या तापमानात गुरुवारी किंचितशी वाढ झाली. या दिवशी ६.४ अंश तापमान नोंदले गेले. राज्यात सर्वात कमी तापमानाची नोंद करणाऱ्या नाशिकमध्ये बोचरा वारा असल्याने दिवसभर उबदार कपडे परिधान करणे क्रमप्राप्त ठरले आहे. गुलाबी थंडीमुळे उत्साहाचे वातावरण असले तरी घसरत्या तापमानामुळे द्राक्ष उत्पादकांची चिंता वाढली आहे.
डिसेंबरच्या सुरुवातीपासून जिल्ह्यात गारव्याचे अस्तित्व ठळकपणे जाणवू लागले. मागील पाच ते सहा दिवस १० ते १५ अंशांदरम्यान राहिलेला पारा बुधवारी सहा अंशांवर आला. गुरुवारी तापमान त्यापेक्षा कमी झाले नाही. उलट त्यात काहीशी वाढ होऊन ते ६.४ अंशांवर गेले. वातावरणातील अकस्मात बदलामुळे शहर व परिसरातील गारठा कायम आहे. तापमान घसरून थंडीची लाट येणे नाशिककरांना नवीन नाही. दरवर्षी जानेवारी वा फेब्रुवारी महिन्यात तापमान या पातळीवर जात असते. तथापि, चार वर्षांनंतर डिसेंबर महिन्यात प्रथमच पारा इतका खाली घसरला आहे. गुरुवारी बोचऱ्या वाऱ्यामुळे दिवसभर वातावरण थंडगार राहिले. गत पाच वर्षांतील नीचांकी तापमानाचा कालावधी लक्षात घेतल्यास ही नोंद सर्वसाधारपणे जानेवारी वा फेब्रुवारी महिन्यात होत असते. यंदा महिनाभर आधीच तापमानाने नीचांकी पातळी गाठली. कडाक्याच्या थंडीमुळे सकाळी घराबाहेर पडणारे नागरिक, शाळा व महाविद्यालयांत जाणारे विद्यार्थी आणि नोकरदार अशा सर्वाना दिवसभर उबदार कपडे परिधान करणे भाग पडले. थंडीची लाट कायम राहिल्यास द्राक्ष बागांवर त्याचा परिणाम होण्याची भीती व्यक्त होत आहे. कडाक्याच्या थंडीमुळे द्राक्ष मण्यांना तडे जाण्याची शक्यता असते. थंडीपासून बचावासाठी द्राक्ष बागांवर औषधांची अतिरिक्त फवारणी करावी लागते. यामुळे उत्पादक धास्तावले आहेत.

Story img Loader