नाशिकमध्ये थंडीचा आणखी काही दिवस मुक्काम
दोन ते तीन आठवडय़ांपासून गारव्याची अनुभूती घेणाऱ्या नाशिकमध्ये सोमवारी पारा नऊ अंशांपर्यंत खाली घसरला आणि प्रत्येकाला हुडहुडी भरल्याचे पाहावयास मिळाले. हंगामातील हे नीचांकी तापमान आहे. थंडीचा कडाका पुढील दोन ते तीन दिवस कायम राहणार असल्याचे हवामानशास्त्र विभागाने म्हटले आहे. निरभ्र आकाश आणि वाऱ्याचा वाढलेला वेग यामुळे वातावरणातील ही स्थिती कायम राहणार आहे. थंडीच्या लाटेचा परिणाम द्राक्ष बागांवर होणार असल्याने उत्पादक धास्तावले आहेत.
[jwplayer 1yLms27W]
समाधानकारक पाऊस झाल्यामुळे यंदा हिवाळा कसा राहणार, याबद्दल सर्वामध्ये असणारी उत्सुकता दिवाळीनंतर शमण्यास सुरुवात झाली. ऑक्टोबरच्या प्रारंभापासून वातावरणात गारव्याचे अस्तित्व जाणवू लागले. १० ते १३ अंशांदरम्यान वातावरणाची पातळी राहिली. रविवारी त्यात विलक्षण बदल होऊन सोमवारी सकाळी नऊ अंशाची नोंद झाली. हंगामातील हे नीचांकी तापमान आहे. कडाक्याच्या थंडीमुळे बहुतेकांना उबदार कपडय़ांचा आधार घेणे क्रमप्राप्त ठरले आहे. सकाळी बराच उशिरापर्यंत व सायंकाळी गारवा जाणवतो. गतवर्षी ऑक्टोबर महिन्यात ११.५ या नीचांकी तापमानाची नोंद झाली होती. थंड हवेसाठी प्रसिद्ध असणाऱ्या नाशिकमध्ये डिसेंबर वा जानेवारी महिन्यात तापमान नीचांकी पातळी गाठते, असा अनुभव आहे. यंदा नोव्हेंबरमध्येच ती पातळी गाठली गेली. महत्त्वाची बाब म्हणजे थंडीची लाट पुढील काही दिवस कायम राहणार असल्याने तापमान आणखी खाली जाण्याचा संभव आहे. उत्तर भारतात थंडीची लाट असल्याने त्या भागातून वाहत येणाऱ्या वाऱ्याचा प्रभाव नाशिकसह उत्तर महाराष्ट्राच्या वातावरणावर पडतो. सध्या आकाश निरभ्र झालेले आहे. वाऱ्याचा वेगही वाढल्याने थंडीची तीव्रता जाणवत असल्याचे हवामानशास्त्र विभागाकडून सांगण्यात आले. गतवर्षी डिसेंबर महिन्यात नाशिकमध्ये ५.२ अंश या तापमानाची नोंद झाली होती. या वर्षी तापमान किती अंशापर्यंत खाली जाणार, याकडे सर्वाचे लक्ष आहे.
थंडीचा कडाका वाढल्याने द्राक्ष उत्पादक धास्तावले आहेत. अवकाळी पाऊस आणि टंचाईमुळे द्राक्ष बागांचे आधीच मोठे नुकसान झाले. तापमानाची कमी होणारी पातळी द्राक्ष पिकांसाठी हानीकारक ठरणारी आहे. ऑक्टोबरमध्ये छाटणी झालेल्या द्राक्ष बागा फुलोऱ्याच्या अवस्थेत असून थंडी कायम राहिल्यास त्यांच्या विकासावर परिणाम होणार आहे. गारव्यामुळे अन्नघटक उपलब्ध होण्यास द्राक्ष बागांवर मर्यादा पडतात. त्यामुळे मण्यांचा आकार मर्यादित राहू शकतो. त्याचा परिणाम द्राक्ष घडाचे वजन कमी भरण्यावर होतो. निर्यातक्षम द्राक्षासाठी हार्मोन्स दिली जातात. या वातावरणात हार्मोन्स देऊनही फारसा उपयोग होत नसल्याचे द्राक्ष उत्पादकांकडून सांगण्यात आले. तापमान आणखी घसरल्यास उत्पादकांना शेकोटी पेटवून उबदार वातावरण तयार करण्यासाठी कसरत करावी लागते की काय, अशी धास्ती व्यक्त होत आहे.
[jwplayer OnydZc5l]