नाशिक – राज्य शासनाने महिलांच्या सन्मानार्थ मुख्यमंत्री माझी लाडकी बहीणसह विविध योजना सुरू केल्या आहेत. या योजनांच्या माध्यमातून महिला अधिक सक्षम होवून सर्व क्षेत्रात उन्नती साधतील, असा विश्वास जिल्हाधिकारी जलज शर्मा यांनी व्यक्त केला.

येथील ठक्कर डोम मैदानात शनिवारी जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालयामार्फत जिल्हास्तरीय मार्गदर्शक महिला मेळावा घेण्यात आला. या मेळाव्यात जिल्हाधिकारी शर्मा यांनी मार्गदर्शन केले. यावेळी आमदार सीमा हिरे, महानगरपालिका आयुक्त डॉ. अशोक करंजकर, महिला व बालविकासचे विभागीय उपायुक्त चंद्रशेखर पगारे, महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त प्रदीप चौधरी, जिल्हा कार्यक्रम अधिकारी प्रताप पाटील, जिल्हा महिला व बालविकास अधिकारी सुनील दुसाणे आदी उपस्थित होते.

हेही वाचा >>>नंदुरबार जिल्ह्यास पुन्हा भूकंपाचे धक्के

यावेळी जिल्हाधिकारी शर्मा यांनी, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी जिल्ह्यात आतापर्यंत १४ लाख ९३ हजार अर्ज प्राप्त झाले असून त्यापैकी १४ लाख ६८ हजार पात्र लाभार्थ्यांपैकी १४ लाख ६५ हजार लाभार्थ्यांना बँक खात्यावर दोन महिन्यांचा लाभ देण्यात आला असल्याचे सांगितले. ९० टक्के महिलांना या योजनेचा तिसराही लाभ प्राप्त झाला आहे. ज्या लाभार्थ्यांचे आधार क्रमांक बँक खात्याशी संलग्न झालेले नाहीत, ते करण्यासाठी जिल्ह्यातील सर्व बँकाना सूचना देण्यात आल्या आहेत. गरजू महिलांना पिंक ई-रिक्षा शासनाकडून उपलब्ध होणार असून नाशिक शहरासाठी एक हजार लाभार्थी संख्या मंजूर करण्यात आली असल्याचे शर्मा यांनी नमूद केले.

हेही वाचा >>>धुळे: अबब… एक कोटीचे अमली पदार्थ जप्त

जिल्हा महिला व बालविकास अधिकारी दुसाणे यांनी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसह पिंक रिक्षा योजनेची माहिती दिली. कुटूंबातील एकल बालकांसाठी शिक्षण व पोषण बाल संगोपन योजनेद्वारे बालकाच्या खात्यावर दोन हजार २५० रुपये अनुदान वर्ग करण्यात येते. बालकांच्या सुरक्षितेसाठी १०९८ हेल्पलाईन सुरू करण्यात आली असून महिलांच्या सुरक्षिततेसाठी १८१ ही हेल्पलाईन महिला व बाल विकास विभागामार्फत सुरू करण्यात आली असल्याची माहिती दुसाणे यांनी दिली.