नाशिक : शारीरिकदृष्ट्या अपंग असणाऱ्या बांधवांसाठी जिल्हाधिकारी जलज शर्मा यांनी आपल्या दालनाबाहेर येत म्हणजे तळ मजल्यावर तक्रारी ऐकण्यासाठी प्रथमच बैठक घेतली. अपंग बांधवांनी या उपक्रमाचे स्वागत करुन आपल्या विविध अडचणी मांडल्या. अपंग बांधवांसाठी हा उपक्रम नियमितपणे राबविण्याचा मनोदय व्यक्त करण्यात आला आहे.

अपंग बांधवांच्यावतीने अनेकदा पहिल्या मजल्यावरील जिल्हाधिकारी कार्यालयात जाणे अशक्य असल्याकडे लक्ष वेधले जात असे. संबंधितांच्या मोर्चावेळी हा विषय सातत्याने मांडला गेला आहे. ब्रिटीशकालीन जिल्हाधिकारी कार्यालयात उद्वाहन नाही. पायऱ्या चढूनच वर जावे लागते.

हे ही वाचा…नाशिक :काँग्रेस सेवादलातर्फे स्मार्ट सिटीच्या कामांविरोधात आंदोलन

वृध्द तसेच अपंग व्यक्तींना पायऱ्या चढणे शक्य होत नसल्याने अलीकडेच प्रशासनाने दर गुरुवारी सकाळी ११ ते १२ या वेळेत अपंग बांधवांच्या समस्यांचे निराकरण करण्यासाठी इमारतीतील तळ मजल्यावरील रोहयो उपजिल्हाधिकारी कक्षात जिल्हाधिकारी आणि सर्व कक्ष अधिकारी उपस्थित राहणार असल्याचे निश्चित करण्यात आले. त्यानुसार गुरुवारी सकाळी जिल्हाधिकारी शर्मा यांच्या उपस्थितीत पहिलीच बैठक पार पडली. यावेळी २५ ते ३० अपंग बांधवांनी सहभागी होत आपल्या अडचणी, प्रश्न मांडले.

अपंग बांधवांच्या मागण्या आणि प्रश्न जाणून घेण्यासाठी प्रायोगिक तत्वावर हा उपक्रम सुरू करण्यात आला आहे. याच धर्तीवर ग्रामीण भागातील महसूल कार्यालयांत तो राबविण्याचे नियोजन केले जात आहे. यावेळी अपंग बांधवांनी ग्रामीण भागातील अनेक शासकीय कार्यालयात अजूनही ये-जा करण्यासाठी सोयीस्कर उताराची व्यवस्था नाही. त्यामुळे विविध कामांसाठी त्या ठिकाणी जाताना अडचणींना तोंड द्यावे लागत असल्याकडे लक्ष वेधले. संजय गांधी निराधार योजनेतील दीड हजार रुपयांचे अनुदान वेळेवर मिळत नसल्याची तक्रार काहींनी केली. शासनाकडून अनुदान आल्यानंतर लगेचच ते वितरित केले जाते, असे जिल्हाधिकाऱ्यांनी नमूद केले. अपंगांना घरकूल मिळत नाही, अपंगत्व प्रमाणपत्रांच्या पुनर्पडताळणीस विलंब, असे विषय मांडले. जिल्हाधिकाऱ्यांनी तळ मजल्यावर बैठक घेऊन आमचे म्हणणे जाणून घेतल्याबद्दल अनेकांनी समाधान व्यक्त केले.

हे ही वाचा… गणेशोत्सवात नाशिकमध्ये मध्यवर्ती रस्त्यांवर वाहतुकीचे निर्बंध – दुपारी तीन ते रात्री १२ वेळेत प्रवेश बंद

अपंगांकडून स्वागत

जिल्हाधिकारी जलज शर्मा यांनी आपल्या दालनातून बाहेर पडत थेट तळमजला गाठून समस्या ऐकून घेतल्याने अपंग बांधवांनी समाधान व्यक्त केले. जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनापर्यंत पोहचण्यासाठी पायऱ्या चढणे भाग आहे. त्यामुळे अपंग तसेच वृध्दांना जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेणे कठीण झाले होते. यासंदर्भातील तक्रारींची दखल घेत जिल्हाधिकारी शर्मा यांनी स्वत: पुढाकार घेत समस्या सोडवली.

Story img Loader