महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत इयत्ता १२ वी परीक्षा २१ फेब्रुवारी ते २१ मार्च या कालावधीत आणि इयत्ता १० वीची परीक्षा दोन ते २५ मार्च या कालावधीत होणार आहे. परीक्षांचे संचालन सुयोग्य प्रकारे होवून परीक्षा केंद्रांवर कोणताही गैरप्रकार घडू नये यासाठी जिल्ह्यात कॉपीमुक्त परीक्षा अभियान प्रभावीपणे राबविण्यात येणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी गंगाथरन डी. यांनी दिली.जिल्ह्यात इयत्ता १२ वी परीक्षेसाठी १०८ केंद्रांवर ७४ हजार ९३२ तर, इयत्ता १० वीच्या २०३ केंद्रांवर ९१ हजार ६६९ विद्यार्थी परीक्षा देणार आहेत. परीक्षा सुरळीत, शांततेत आणि कॉपीविरहीत पार पडण्याकरिता शिक्षण विभागासह महसूल आणि जिल्हा परिषदेशी संलग्न असलेल्या इतर विभागांकडून संनियंत्रण करण्यात येणार आहे. परीक्षा केंद्रांची अतिसंवेदनशील, संवेदनशील, उपद्रवी व सर्वसाधारण अशी वर्गवारी करण्यात आली असून कॉपीचे प्रकार होणाऱ्या परीक्षा केंद्रांवर विशेष बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे जिल्हाधिकारी, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी, पोलीस आयुक्त आणि पोलीस अधीक्षक, उपजिल्हाधिकारी, प्रांताधिकारी हे परीक्षा कालावधीत केंद्रांवर आकस्मितपणे भेटी देणार आहेत.
हेही वाचा >>>नाशिक : बोराळे फाट्याजवळील अपघातात तीन जणांचा मृत्यू; मृतांमध्ये काका, पुतण्यांचा समावेश
पर्यवेक्षक म्हणून एकाच शाळेचे अथवा संस्थेचे सर्व शिक्षक त्यांच्याच शाळेतील परीक्षा केंद्रावर न नेमता, मूळ शाळेचे काही शिक्षक आणि इतर शाळांचे काही शिक्षक अशा पद्धतीने पर्यवेक्षक नेमण्यात यावेत, अशी सूचनाही जिल्हाधिकाऱ्यांनी केली आहे. परीक्षेला आल्यानंतर विद्यार्थ्यांची तपासणी करण्यात यावी. परीक्षेचे गोपनीय साहित्य नेणाऱ्या कर्मचाऱ्याचा जीपीएसव्दारे ठावठिकाणा घेतला जाणार असून परीक्षेसाठी नेमण्यात आलेल्या कर्मचाऱ्यांव्यतिरिक्त कोणीही अनधिकृत व्यक्ती परीक्षा केंद्रांवर आढळल्यास संबंधितांवर कारवाई करण्यात येणार आहे. विद्यार्थी कॉपी करतांना आढळल्यास विद्यार्थ्यावर आणि या गैरप्रकारात सहभागी व्यक्तीवर देखील कारवाई करण्यात येणार असल्याचे जिल्हाधिकारी गंगाथरन डी. यांनी सांगितले.
हेही वाचा >>>नाशिक : बोराळे फाट्याजवळील अपघातात तीन जणांचा मृत्यू; मृतांमध्ये काका, पुतण्यांचा समावेश
परीक्षा सुरू होण्यास अजून काही दिवस बाकी असल्याने विद्यार्थ्यांनी अभ्यासाचा सराव करून आत्मविश्वासाने व निर्भयमुक्त वातावरणात परीक्षा द्यावी. जिल्ह्यात कॉपीमुक्त अभियान प्रभावीपणे राबविण्यासाठी पालक, विद्यार्थी, संस्थाचालक, मुख्याध्यापक व शिक्षक यांनी सहभागी व्हावे, असे आवाहनही जिल्हाधिकारी गंगाथरन डी. यांनी केले आहे.
विद्यार्थ्यांसाठी मदतवाहिनी
राज्यात इयत्ता १० वी, १२ वीच्या परीक्षेस बसलेले विद्यार्थी, पालकांना अडचणी आल्यास, प्रवेशपत्र, वेळापत्रक, विषय बदल, ऐनवेळी अपघात झाल्यास त्यासंबंधी काय कारवाई करावी, परीक्षा कालावधीत नैसर्गिक व आपत्कालीन प्रसंगी येणाऱ्या अडी अडचणीं विषयी मार्गदर्शन करण्यासाठी नियंत्रण समिती तयार करण्यात आली आहे. यासाठी ०२५३-२९५०४१९, ०२५३-२९४५२४१, ०२५३-२९४५२५१ या क्रमांकावर संपर्क साधावा. तसेच विद्यार्थ्यांच्या समुपदेशनासाठी मदतवाहिनी सुरू केली आहे. नाशिक शहरासाठी किरण बावा (९४२३१८४१४१), अरूण जायभावे (८६६८५७९०९७) या क्रमांकावर विद्यार्थ्यांनी संपर्क साधावा.