लोकसत्ता विशेष प्रतिनिधी
नाशिक : बीएचएमएस अभ्यासक्रमाच्या परीक्षेसाठी महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाकडून वितरित झालेल्या आणि होणाऱ्या प्रवेशपत्रात विद्यार्थी उपस्थितीच्या निकषाचे काटेकोरपणे पालन करण्याची जबाबदारी अधिष्ठाता आणि महाविद्यालयांवर टाकण्यात आली आहे. अपात्र विद्यार्थी परीक्षेला बसणार नाही, याची खबरदारी त्यांना घ्यावी लागणार आहे.
बीएचएमएस अभ्यासक्रमाच्या हिवाळी सत्राच्या परीक्षेशी संबंधित हा विषय आहे. आरोग्य विद्यापीठाच्या परीक्षा विभागाने राज्यातील होमिओपॅथी महाविद्यालांचे प्राचार्य व अधिष्ठातांना सूचना दिल्या आहेत. या परीक्षेसाठी विषयनिहाय कमी उपस्थिती असणाऱ्या विद्यार्थ्यांचे अर्ज महाविद्यालयांकडून सादर झाले. लेखी आणि प्रात्यक्षिक परीक्षेसाठी किमान ७५ ते कमाल ८० टक्के उपस्थिती बंधनकारक असते. दोन महिने आधी अर्जाची प्रक्रिया पार पडते. त्यामुळे पुढील काळात महाविद्यालयांनी जादा तासिका घेऊन उपस्थिती पूर्ण केली असल्यास त्याची माहिती सादर करावी, असे विद्यापीठाने सूचित केले आहे.
आणखी वाचा-नाशिक : शहरातील चार स्थानकांतून बससेवेचे नियोजन
उपस्थितीचा निकष पूर्ण नसणाऱ्या विद्यार्थ्यांना विद्यापीठ प्रवेशपत्र देणार नाही. परंतु, काही विषयात पात्र असणाऱ्या विद्यार्थ्यांच्या वितरित झालेल्या प्रवेशपत्रावर अपात्र असणाऱ्या संबंधित विषयासमोर लाल शाईने अपात्र नोंदवून महाविद्यालयांनी त्यांना प्रवेशपत्र द्यावे. सर्व विषयात अपात्र असणाऱ्यांना प्रवेशपत्र देऊ नये. त्यांच्या विषयांसमोर अपात्र शेरा नोंदवून प्रवेशपत्र विद्यापीठास परत करावे. उपस्थितीच्या निकषात अपात्र ठरलेले विद्यार्थी परीक्षेला बसणार नाहीत, याची दक्षता घेण्याची जबाबदारी सर्वस्वी महाविद्यालयांची असल्याचे परीक्षा नियंत्रक डॉ. संदीप कडू यांनी म्हटले आहे.
आरोग्य विद्यापीठाच्या अंतर्गत राज्यात सुमारे ५६८ महाविद्यालये असून विविध अभ्यासक्रमात सुमारे एक लाख विद्यार्थी शिक्षण घेतात. उपस्थितीच्या निकषाच्या आधारे विद्यार्थ्यांना परीक्षा देता येईल की नाही, हे महाविद्यालये स्थानिक पातळीवर अधिक काटेकोरपणे पाहू शकतात. ही नेहमीची प्रक्रिया असल्याचे परीक्षा विभागाचे म्हणणे आहे.