लोकसत्ता प्रतिनिधी
नाशिक: महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठात भारतीय वैद्यकशास्त्र आयुर्वेद शाखेच्या पदवी (बीएएमएस) आणि पदव्युत्तर पदवी (एमएस प्रसूतीशास्त्र, स्रीरोग) अभ्यासक्रमात पुत्रकामेष्टी यज्ञ तसेच इच्छित पुत्र प्राप्ती कशी करावी, हे शिकविले जात असल्याचा दावा महाराष्ट्र अंधश्रध्दा निर्मूलन समितीने केला आहे. गर्भधारणापूर्व आणि प्रसूतीपूर्व गर्भधारणा निदान तंत्र या कायद्याचा भंग होत आहे. ही बाब भारतीय संविधानाच्या पूर्णपणे विसंगत असून संबंधित पाठ्यभाग अभ्यासक्रमातून वगळण्याबाबत विद्यापीठाने तत्काळ कार्यवाही करावी, अशी मागणी निवेदनाव्दारे महाराष्ट्र अंनिसने विद्यापीठाकडे केली आहे.
आणखी वाचा-नाशिक: मणिपूर अत्याचार निषेधार्थ एकलव्य संघटनेचा मोर्चा
गर्भलिंग निदान कायद्यान्वये कीर्तनकार निवृत्ती इंदुरीकर यांच्यावर दाखल असलेला गुन्हा पुढे चालविण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिलेले असतानाही महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठातून कालबाह्य आणि अवैज्ञानिक भाग वैद्यकीय अभ्यासक्रमात शिकविला जात असल्याचे अंनिसने म्हटले आहे. त्यामुळे लोकांचे अज्ञान वाढून ते दैववादाकडे झुकतात. साहजिकच भोंदूगिरीला त्यामुळे बळ मिळते. विद्यापीठाने आयुष मंत्रालयाला अभ्यासक्रमातील पाठ्यांश वगळण्याबाबत तत्काळ कळवावे. त्यांच्यामार्फत सेंट्रल कौन्सिल ऑफ इंडियन मेडिसिनला कळविले जाईल आणि सदर अवैज्ञानिक, कालबाह्य भाग अभ्यासक्रमातून वगळला जाईल, अशा प्रकारची व्यवस्था करावी, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. निवेदन विद्यापीठाला दिले असल्याचे अंनिसने म्हटले आहे. अंनिसचे राज्य प्रधान सचिव डॉ. ठकसेन गोराणे, राज्य कार्यवाह कृष्णा चांदगुडे, डॉ. सुदेश घोडेराव, राज्य सदस्य प्रल्हाद मिस्री, जिल्हा प्रधान सचिव नितिन बागूल यांची स्वाक्षरी आहे.
आणखी वाचा-नाशिकमध्ये ३१ टवाळखोरांविरुध्द कारवाई; परिमंडळ दोनची तपासणी मोहीम
महाराष्ट्र अंधश्रध्दा निर्मूलन समितीकडून निवेदन देण्यात आल्याचा दावा करण्यात येत असला तरी शनिवारी विद्यापीठाला सुट्टी असल्याने निवेदन स्वीकारण्याचा प्रश्नच येत नाही. निवेदन मिळाल्यावरच यासंदर्भात उत्तर देण्यात येईल. -डॉ. स्वप्निल तोरणे (जनसंपर्क अधिकारी, महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ)