नाशिक : त्र्यंबकेश्वर, इगतपुरी तालुक्यातील जल जीवन योजनेच्या कामांची चौकशी करण्यासाठी समिती स्थापन करण्याचा निर्णय मंगळवारी उपजिल्हाधिकारी कार्यालयात पाणी प्रश्नी आयोजित बैठकीत घेण्यात आला.त्र्यंबकेश्वरसह इगतपुरी तालुक्यात पाणी प्रश्न बिकट होत असल्याने या विषयाकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी एल्गार कष्टकरी संघटनेच्या वतीने सातत्याने आक्रमक भूमिका घेण्यात आली आहे.

त्र्यंबकेश्वर, इगतपुरी तालुक्यातील पाणी प्रश्नाविषयी मंत्रालयावर मोर्चा काढण्याचा इशारा देण्यात संघटनेने दिला होता. या इशाऱ्यानंतर प्रशासनाने मंगळवारी या विषयावर चर्चा करण्याचे लेखी आश्वासन दिल्याने संघटनेने मोर्चा स्थगित केला होता. त्यानुसार मंगळवारी उपजिल्हाधिकारी कार्यालयात बैठक घेण्यात आली.बैठकीत जल जीवन योजनेच्या कामांची चौकशी करण्यासाठी समिती स्थापन करण्याचे ठरविण्यात आले. तसेच त्र्यंबकेश्वर आणि इगतपुरी तालुक्यातील ९० आदिवासी वाड्या-पाड्यांसाठी नव्याने योजना करा, जल जीवन योजनेतून वगळण्यात आलेल्या सर्व ठिकाणी तत्काळ पाण्याची व्यवस्था करावी, अशी मागणी संघटनेच्या वतीने करण्यात आली.

दोन दिवस सर्व ठिकाणी पाहणी करून वेळेत काम न करणाऱ्या २३१ जणांवर कारवाई करण्यात आल्याची माहिती पाणीपुरवठा अधिकाऱ्यांनी दिली. त्यांच्याकडून लाखो रुपयांचा दंड वसूल केल्याचेही सांगण्यात आले. पूर्ण झालेल्या योजनांची चौकशी करण्यासाठी पाणीपुरवठा अधिकारी आणि तहसीलदार यांची संयुक्त समिती करण्यात आली. जाणीवपूर्वक आदिवासींना पाणी पुरवठा मिळण्यापासून वंचित ठेवल्याने इगतपुरी तालुक्यातील धारगाव आणि कुशेगाव येथील ग्रामसेवकांना कारणे दाखवा नोटीस देण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.

बैठकीस इगतपुरीचे तहसीलदार अभिजीत बारावकर, मुख्य कार्यकारी अभियंता (पाणीपुरवठा) निवडुंगे, उपअभियंता अजित सूर्यवंशी, त्र्यंबकेश्वरचे गटविकास अधिकारी, जीवन प्राधिकरण, वन विभाग, वीज वितरण, पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांसह पोलीस अधिकारी उपस्थित होते. एल्गार कष्टकरी संघटनेचे भगवान मधे आणि इतर कार्यकर्ते उपस्थित होते.