लोकसत्ता प्रतिनिधी

नाशिक : इगतपुरी तालुक्यातील पिंप्री येथील एकलव्य मॉडेल निवासी शाळेत निकृष्ट दर्जाचे भोजन दिले जात असल्याने गुरुवारी दुपारपासून शेकडो आदिवासी विद्यार्थ्यांनी शाळेसमोर ठिय्या दिला. कडाक्याच्या थंडीत रात्री उशिरापर्यंत हे विद्यार्थी चांगल्या भोजनाची प्रतीक्षा करत असताना रात्री उशीरा पोलीस प्रशासनाने त्यांच्या जेवणाची व्यवस्था केली. शुक्रवारी सकाळपासून विद्यार्थ्यांना पुन्हा जेवण देण्यास सुरुवात झाली. या प्रकरणाच्या चौकशीसाठी समिती स्थापन करण्यात आली असून अहवाल प्राप्त झाल्यानंतर दोषींवर कारवाई केली जाईल, असा इशारा आदिवासी विकास विभाग आयुक्त नयना गुंडे यांनी दिला आहे.

इगतपुरी तालुक्यातील मुंढेगाव येथील मध्यवर्ती स्वयंपाकगृहातून (सेंट्रल किचन) तालुक्यासह आसपासच्या पाच एकलव्य मॉडेल निवासी शाळांसह शासकीय ४४ आश्रमशाळेतील २५ ते ३० हजार विद्यार्थ्यांना भोजन पुरवले जाते. भोजनाच्या दर्जाविषयी विद्यार्थ्यांचे आक्षेप आहेत. पिंप्रीतील एकलव्य शाळेत दिले जाणारे भोजन अतिशय निकृष्ट दर्जाचे असल्याने विद्यार्थ्यांनी आदिवासी विकास परिषदेकडे तक्रार केली होती. शाळा व्यवस्थापनाकडे दाद मागूनही दखल घेतली गेली नसल्याचे त्यांचे म्हणणे आहे. गुरूवारी दुपारपासून शाळेसमोर ठिय्या दिलेले आंदोलक विद्यार्थी रात्री उशीरापर्यंत उपाशी होते. पोलीस प्रशासनाच्या सहकार्याने त्यांच्या जेवणाची व्यवस्था करण्यात आली.

आणखी वाचा-देवेंद्र फडणवीस योग्य वेळी आदित्य ठाकरेंना शिक्षा देतील – गुलाबराव पाटील यांचा दावा

शुक्रवारी आमदार हिरामण खोसकर, विद्यार्थ्यांचे पालक आणि आदिवासी विकास परिषदेचे लकी जाधव यांनी आदिवासी विकास विभाग आयुक्त नयना गुंडे यांची भेट घेतली. जाधव यांनी विद्यार्थ्यांच्या समस्यांकडे लक्ष वेधले. आमदार खोसकर यांनी मध्यवर्ती स्वयंपाकगृहातील कामकाजावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीनेही निवेदन देत तत्काळ कारवाईची मागणी करण्यात आली. दरम्यान, पिंप्री शाळेतील विद्यार्थ्यांना सकाळपासून नियमितपणे नाश्ता व जेवण देण्यात आले.

दरम्यान, मध्यवर्ती स्वयंपाकगृह पध्दतीचे कामकाज व जेवणाचा दर्जा न सुधाल्यास दोन दिवसानंतर तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडून मध्यवर्ती स्वयंपाकगृह व्यवस्था बंद करण्यात येईल, असा इशारा आदिवासी परिषदेचे लकी जाधव यांनी दिला.

आणखी वाचा-नाशिक महापालिका निवडणूक शिवसेना ठाकरे गट स्वबळावर लढणार

दोषींवर कारवाई करणार

एकलव्य मॉडेल निवासी शाळा तसेच इतर शासकीय आश्रमशाळांमधील सर्व प्रकाराची सखोल चौकशी करण्यासाठी आदिवासी उपआयुक्त सुदर्शन नगरे यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आली आहे. आठ दिवसात अहवाल मागवण्यात आला असून दोषींवर कारवाई करण्यात येईल. विद्यार्थ्यांना नियमित जेवण देण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. -नयना गुंडे (आयुक्त, आदिवासी विकास विभाग)

मध्यवर्ती स्वयंपाकगृहता निकृष्ट भाजीपाला, अस्वच्छता

इगतपुरी तालुक्यातील मुंढेगाव येथील मध्यवर्ती स्वयंपाकगृहाची आमदार हिरामण खोसकर यांनी गुरुवारी पाहणी केली असता सडलेला भाजीपाला, निकृष्ट कडधान्य, अर्धवट भाजलेल्या चपात्या, अस्वच्छता असे सर्वकाही दिसून आले. रोजच्या आहारामध्ये वापरली जाणारी हरभरा, वाटाणा व चवळी ही कडधान्ये किडलेली, बुरशीयुक्त असल्याचे दिसले. कडधान्यांमध्ये मोठ्या प्रमाणात किडे आढळून आले. किड्यांनी पोखरलेले कडधान्य विद्यार्थ्यांना खाण्यासाठी दिले जात आहे. चपात्यांसाठी वापरले जाणारे पीठ निकृष्ट गव्हाचे आहे. यावेळी मध्यवर्ती स्वयंपाकगृहाचे अधीक्षक महेंद्र सपकाळ, कैलास चव्हाण हे देखील उपस्थित होते. आमदार खोसकर यांनी सर्व प्रकार पाहून संताप व्यक्त केला. तालुक्यातील कोणत्याच शाळेला फळे दिले जात नाहीत. फळे मिळतात की नाही, असा प्रश्न अधीक्षक चव्हाण यांना विचारला असता त्यांनी शासनाकडून अजून फळे देण्यात आली नसल्याचा दावा केला.

Story img Loader