नाशिक : लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीच्या पाठीशी उभे राहून प्रचारात उतरलेल्या घटक पक्षांकडून आता विधानसभेच्या जागांसाठी मोर्चेबांधणी सुरू झाली आहे. भारतीय कम्युनिस्ट पक्ष महाराष्ट्र विधानसभेसाठी मतदारसंघांची यादी महाविकास आघाडीच्या नेत्यांना सोपविणार आहे.
भाकपने विधानसभा निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतला आहे. ज्या जागांवर उमेदवार उभे केले जातील, त्यांची यादी राष्ट्रवादी शरद पवार गटाचे प्रमुख शरद पवार, काँग्रेसचे नाना पटोले आणि शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्यासह महविकास आघाडी व इंडिया आघाडीच्या राज्यातील नेत्यांकडे सोपवून चर्चा केली जाणार आहे. लोकसभा निवडणुकीत भाकपने महाविकास आघाडीचा प्रचार केला होता. आयटक, किसान सभेसह सर्व जनसंघटनांनी भाजप हटाव, देश बचाव, संविधान बचावचा नारा देत राज्यभर जनजागरण मोहीम राबवली होती, असे पक्षाचे राज्य सचिव राजू देसले यांनी सांगितले.
हेही वाचा…Video: कसारा घाटात ब्रेक निकामी झालेल्या ट्रेलरची पाच मोटारींना धडक, १४ जण जखमी
डिसेंबरमध्ये राज्यातील कामगार, कर्मचाऱ्यांचा सर्वात मोठा मोर्चा नागपूर विधानसभेवर काढण्यात आला होता. शेतकरी, कामगार विरोधी धोरणे राबविणाऱ्यांना धडा शिकविण्याचे आवाहन पक्षाने केले होते. ३५ दिवस राज्यभर सर्व जिल्ह्यात सभा घेत मोर्चे काढले. याचा चांगला परिणाम लोकसभा निवडणुकीत दिसून आल्याचा दावा पक्षाने केला आहे. भाकपचे नेते डॉ. भालचंद्र कांगो, राज्य सचिव ॲड. सुभाष लांडे यांच्यासह सचिव राजू देसले, डॉ. राम बाहेती हे मविआ नेत्यांशी जागा वाटपाबाबत लवकरच चर्चा करणार करणार आहेत. भाकप महाराष्ट्रचे राज्य सचिव मंडळ आणि राज्य पदाधिकाऱ्यांची बैठक २३ ते २५ जुलै या कालावधीत नाशिक येथे होणार आहे.