रोजच्या विलंबामुळे संतप्त प्रवाशांचे आंदोलन; देखभाल आणि सफाई मुंबईत करण्याची मागणी
हजारो चाकरमान्यांची भिस्त असलेल्या मनमाड-मुंबई पंचवटी एक्स्प्रेसला पाणीटंचाईची झळ बसत असून त्याचा प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष फटका प्रवाशांना सहन करावा लागत आहे. मनमाडमध्ये तीव्र टंचाई असल्याने या रेल्वेगाडीत नाशिक येथे पाणी भरले जाते. त्यामुळे अर्धा तास दररोज आधीच विलंब होत असताना रेल्वे प्रशासन दुरांतो व इतर लांब पल्ल्याच्या गाडय़ांना पुढे मार्गस्थ करत असल्याने संतप्त प्रवाशांनी बुधवारी साखळी खेचून आंदोलन करत आपला संताप व्यक्त केला. या सर्व गदारोळात रेल्वेगाडीला बराच विलंब झाला. मुंबईत ही गाडी नियोजित वेळेच्या ४० मिनिटे विलंबाने पोहोचली. कधी काळी देशात सवरेत्कृष्ट ‘इंटरसिटी एक्स्प्रेस’चा बहुमान मिळविणाऱ्या या गाडीची अवस्था दिवसेंदिवस बिकट होत असल्याने तिची दैनंदिन देखभाल व साफसफाई मुंबईत करण्याची मागणी केली जात आहे.
मनमाडमधील पाणीटंचाईची झळ पंचवटीसह गोदावरी व अन्य काही रेल्वेगाडय़ांनाही बसत आहे. उपरोक्त रेल्वे गाडय़ांची दैनंदिन साफसफाई व देखभाल मनमाड रेल्वे जंक्शनवर केली जाते. तथापि मनमाडला पाण्याच्या दुर्भिक्षाला तोंड द्यावे लागत असताना रेल्वेगाडय़ांच्या साफसफाईसाठी ते कुठून आणणार, असा प्रश्न आहे. परिणामी पंचवटी, गोदावरी व अन्य काही रेल्वे गाडय़ांसाठी नाशिकरोड स्थानकावर पाणी भरले जाते. गत महिनाभरापासून हा मार्ग अवलंबिण्यात आल्याने रेल्वेगाडय़ांना अर्धा तास नाशिकरोडला सक्तीची विश्रांती घ्यावी लागते. बुधवारी सकाळी पंचवटी एक्स्प्रेसमध्ये पाणी भरल्यानंतर दुरांतो व अन्य काही रेल्वेगाडय़ांना पुढे मार्गस्थ करण्यात आले. पंचवटीला विलंब झाला असताना ही गाडी सोडण्याऐवजी रेल्वे प्रशासन उपरोक्त गाडय़ांना प्राधान्य देत असल्याने प्रवासी संतप्त झाले. ७.४५च्या सुमारास पंचवटी मार्गस्थ होऊ लागली असताना काही प्रवाशांनी साखळी खेचून गाडी थांबविली. फलाटावर आणि प्रबंधकांच्या कार्यालयासमोर धाव घेऊन रेल्वेच्या कार्यशैलीविरोधात घोषणाबाजी केली. आंदोलनामुळे गाडीला आणखी विलंब झाला. सकाळी आठच्या सुमारास निघालेली ही गाडी मुंबईत ११ वाजून २० मिनिटांनी पोहोचली. गाडीला ४० मिनिटे विलंब होण्यामागे रेल्वे व्यवस्थापनाचा कारभार कारणीभूत असल्याची प्रवाशांची सार्वत्रिक प्रतिक्रिया आहे.
मुंबईत शासकीय व खासगी संस्थांमध्ये नोकरी करणारे तसेच व्यावसायिक असे हजारो प्रवासी दररोज पंचवटी एक्स्प्रेसने ‘अप-डाऊन’ करतात. मनमाडहून नाशिकला येण्याची वेळ सकाळी सात वाजून पाच मिनिटे असून मुंबईला पोहोचण्याची वेळ १० वाजून ४० मिनिटे आहे. मागील दीड ते दोन महिन्यांपासून रेल्वेगाडीत पाणी भरावे लागत असल्याने ती २० ते ३० मिनिटे विलंबाने मार्गस्थ होते. या स्थितीत पंचवटीला बाजूला ठेवून इतर गाडय़ांना मार्गस्थ करणे ही नित्याची बाब झाल्याची तक्रार रेल परिषदेचे अध्यक्ष बिपिन गांधी यांनी केली.
रेल्वेगाडीला विलंब झाल्यास कार्यालयीन वेळेत पोहोचणे अवघड ठरते. दररोज हजारो प्रवाशांना या प्रश्नाला तोंड द्यावे लागत आहे. मुळात २००८ मध्ये पंचवटी एक्स्प्रेसला सवरेत्कृष्ट इंटरसिटी एक्स्प्रेसचा पुरस्कार मिळाला होता. २२ डबे असणारी ही देशातील एकमेव इंटरसिटी एक्स्प्रेस आहे. तिच्या नावलौकिकात भर घालण्याऐवजी तिचे अध:पतन प्रशासनाकडून सुरू आहे.
अंतर्गत भागाची नियमित साफसफाई केली जात नाही. मनमाडला टंचाई असल्याने रेल्वेगाडीची स्वच्छता व देखभाल जिकीरीचे ठरले आहे. पंचवटी व गोदावरी एक्स्प्रेसची दैनंदिन साफसफाई व देखभालीचे काम मुंबई विभागाकडे सोपवावे, अशी मागणी रेल परिषदेने केली आहे. काही वर्षांपूर्वी पंचवटी एक्स्प्रेसचे हे काम मुंबई विभागाकडे होते. नंतर ते मनमाड जंक्शनकडे वर्ग झाला.
या भागातील स्थिती लक्षात घेऊन हे काम पुन्हा मुंबईत केले जावे, याकडे गांधी यांनी लक्ष वेधले.

Story img Loader