जळगाव : सनदी अधिकारी होण्याचे स्वप्न पाहणाऱ्या अनुसूचित जाती-जमातीच्या विद्यार्थ्यांसाठी कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात सुरु करण्यात आलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्राला काही महिन्यांपासून शासनाकडून अनुदानच मिळालेले नाही. त्यामुळे केंद्र आता ओस पडले असून मागासवर्गीय व आदिवासी विद्यार्थ्यांची त्यामुळे गैरसोय झाली आहे.

विद्यापीठात उभारलेल्या स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्रात पुणे येथील आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्थेच्या (टीआरटीआय) सहकार्याने २०१७-१८ मध्ये अनुसूचित जमातीच्या ५० विद्यार्थ्यांच्या पहिल्या तुकडीला लोकसेवा आयोगाच्या पूर्व परीक्षांचे प्रशिक्षण देण्यात आले होते. त्यावेळी संबंधित विद्यार्थ्यांना आठ महिन्यांच्या प्रशिक्षण कालावधीसाठी दरमहा चार हजार रुपये विद्यावेतन देण्याची तरतूद होती. नंतर विद्यार्थ्यांची उपस्थिती वाढवण्यासाठी विद्यावेतन सहा हजार रुपये तसेच प्रशिक्षण कालावधी ११ महिने करण्यासह राज्य लोकसेवा आयोगाच्या परीक्षांचे मार्गदर्शन सुरू करण्यात आले.

पुढे डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्थेकडून (बार्टी) अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांसाठी स्वतंत्र तुकडी सुरू करण्यासाठी स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्राला वाढीव निधी उपलब्ध झाला. त्यानुसार, स्पर्धा परीक्षा केंद्रात २०१७-१८ ते २०२३-२४ या कालावधीत अनुसूचित जाती आणि जमातीच्या सुमारे १५० विद्यार्थ्यांना विद्यावेतनासह केंद्रीय आणि महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या प्रशासकीय सेवा स्पर्धा पूर्व परीक्षांच्या प्रशिक्षणाचा लाभ देण्यात आला.

दरम्यान, करोनामुळे दोन वर्षे स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्रात कोणत्याच विद्यार्थ्याला प्रवेश देण्यात आला नाही. प्रशासकीय सेवा पूर्व परीक्षेचे प्रशिक्षण देणाऱ्या तुकड्या पूर्ववत सुरू होण्यास २०२३-२४ उजाडले. दोन्ही तुकड्या शेवटच्याच ठरल्या. अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांची शेवटची तुकडी १९ मार्च २०२३ रोजी सुरू होऊन १४ एप्रिल २०२४ रोजी समारोप झाला.

अशाच प्रकारे अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांची शेवटची तुकडी चार मार्चला सुरू होऊन आठ सप्टेंबर २०२४ रोजी समारोप झाला. त्यानंतर टीआरटीआय आणि बार्टी या दोन्ही संस्थेकडून विद्यार्थ्यांच्या नवीन तुकड्या यापुढे सुरू न करण्याबद्दल विद्यापीठाला रितसर पत्रे पाठवण्यात आले. स्पर्धा परीक्षा केंद्राच्या माध्यमातून विद्यापीठाने दोन्ही शासकीय संस्थांकडे नंतरच्या काळात नवीन तुकड्या सुरू करण्यासह अनुदानासाठी बराच पाठपुरावा केला. परंतु, यश आलेले नाही.

अनुसूचित जाती-जमातीच्या विद्यार्थ्यांसाठी असलेल्या स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्राला पुणे येथील बार्टी तसेच आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्थेकडून अनुदान मिळावे म्हणून विद्यापीठाकडून पत्रव्यवहार करण्यात आला आहे. मात्र, अद्याप कोणताच प्रतिसाद मिळालेला नाही. -प्रा.अजय सुरवाडे (संचालक, डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र)