आर्थिक फसवणुकीतून आलेल्या नैराश्याने विषारी औषध सेवन करणारे नाशिकरोड येथील गुंतवणूक सल्लागार विश्वास रामचंद्र जाधव (६९) यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. महिनाभरापूर्वी त्यांनी राहत्या घरी विषप्राशन केले होते. त्यांच्या कार्यालयात सापडलेल्या चिठ्ठीवरून नातेवाईकांनी पोलिसात तक्रार दिली. आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी चार संशयितांविरुद्ध उपनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
जेलरोड परिसरात राहणारे विश्वास जाधव हे गुंतवणूक सल्लागार म्हणून कार्यरत होते. त्यांनी बहुतांश नागरिकांना सोल्युशन ट्रेडमध्ये पैसे गुंतविण्याचा सल्ला दिला. स्वत जाधव यांनी एक कोटी ६१ लाख रुपयांची गुंतवणूक या माध्यमातून केली. मात्र गुंतवणूकदारांनी तगादा लावल्याने त्यातील ८३ लाखांची रक्कम स्वकमाईतून त्यांनी परत केली. यानंतर ही रक्कम तसेच मूळ रक्कम परत मिळावी, यासाठी त्यांनी सोल्युशन ट्रेडकडे तगादा लावला. मात्र काही तांत्रिक अडचणींमुळे त्यांना रक्कम परत मिळण्यास अडचण येत होती. याबाबत कंपनीकडून सकारात्मक प्रतिसाद न मिळाल्याने काही दिवसांपासून ते तणावात होते. घरासमोर असलेल्या झाडांवरून वसाहतीतील दोन शेजाऱ्यांशी त्यांचा वादही सुरू होता. शाब्दिक वादाने त्यांचे मानसिक स्वास्थ्य बिघडले. दरम्यानच्या काळात एका मित्रासमवेत डाळिंब शेतीत २० लाखाची गुंतवणूक केली होती. मात्र हंगामात अपेक्षित उत्पन्न न मिळाल्याने त्यांचा मित्राशी वाद झाला. या एकूणच स्थितीत जाधव यांनी आत्महत्येचा प्रयत्न केला. हा प्रकार लक्षात येताच कुटुंबीयांनी त्यांना खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. महिनाभर उपचार सुरू असताना त्यांचा मृत्यू झाला. मात्र त्यानंतर त्यांचे जावई काळे यांना त्यांच्या कार्यालयात चिठ्ठी आढळली.

Story img Loader