नाशिक महानगरपालिकेतील शिवसेनाप्रणीत म्युनिसिपल कर्मचारी-कामगार सेनेच्या कार्यालयावरून शिंदे आणि ठाकरे गटातील वाद अधिक चिघळला आहे. वसुबारसच्या मुहूर्तावर कामगार सेनेच्या अध्यक्षपदाचा पदभार (ठाकरे गट) महानगरप्रमुख सुधाकर बडगुजर यांनी स्वीकारला. त्यानंतर ठाकरे गटातील व्यक्तींनी अनधिकृतरित्या कुलूप तोडून प्रवेश केला आणि अतिशय महत्वाची कागदपत्रे ताब्यात घेऊन गायब केली असून त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी शिंदे गटाचे महानगरप्रमुख प्रवीण तिदमे यांनी पोलिसांकडे केली आहे.
म्युनिसिपल कर्मचारी सेना ताब्यात राखण्यावरून शिंदे आणि ठाकरे गटात चाललेल्या कुरघोडीने वेगळे वळण घेतले आहे. संघटनेच्या अध्यक्षपदावरून तिदमे यांची हकालपट्टी करीत या पदावर मध्यंतरी सेना ठाकरे गटाने महानगरप्रमुख सुधाकर बडगुजर यांची नियुक्ती केली होती. त्यांनी वसुबारसच्या मुहूर्तावर पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत या पदाचा कार्यभार संघटनेच्या कार्यालयात स्वीकारला. शुक्रवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे नाशिक दौऱ्यावर असताना ठाकरे गटाचा हा कार्यक्रम झाला. त्यावर शिंदे गटाचे महानगरप्रमुख आणि म्युनिसिपल कर्मचारी सेनेचे अध्यक्ष तिदमे यांनी आक्षेप घेतला आहे. ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी आपल्या कार्यालयाचे कुलूप तोडून अनधिकृतरित्या प्रवेश केल्याचे त्यांनी पोलिसात दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे.
मुख्यमंत्री दौऱ्यामुळे आपण नियोजनात तर पोलीस यंत्रणा बंदोबस्तात व्यस्त होती. याचा गैरफायदा घेत बडगुजर, रवी येडेकर यासह १०० ते १५० लोकांनी कुठल्याही संविधानिक व कायदेशीर पदावर नसतानाही मनपातील आपल्या कार्यालयात बेकायदेशीरपणे प्रवेश केला. संघटनेची महत्वाची कागदपत्रे परस्पर ताब्यात घेऊन गहाळ केली. संबंधितांनी यापूर्वी देखील अनधिकृतपणे प्रवेशाचा प्रयत्न केला होता. पोलिसांनी सतर्कता बाळगत तो रोखल्याने अनर्थ टळला होता. बडगुजर यांना स्वत:हून पदाधिकारी होण्याचा अथवा नेमण्याचा कुठलाही कायदेशीर अधिकार नाही. आमच्या संघटनेतील तरतुदी पाहता ते अनाधिकाराने पदाधिकारी घोषित करीत आहेत. हे नियमबाह्य व बेकायदेशीर असून त्यांच्यावर कठोर कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी तिदमे गटाने सरकारवाडा पोलिसांकडे दिलेल्या तक्रारीत केली आहे.