मालेगावमध्ये खासदार सुभाष भामरे यांच्या उपस्थितीत ओला दुष्काळ आढावा बैठक घेण्यात आली. पंचायत समिती सभागृहात ही बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत विमा कंपन्यांच्या कार्यपध्दतीविरोधात अक्षरश: तक्रारींचा पाऊस पडला.
हेही वाचा- शिक्षक गायब, विद्यार्थीच शिक्षकांच्या भूमिकेत…प्रकरण नेमके काय आहे?
विमा कंपन्यांकडून वेळेवर पंचनामे होत नाहीत
बैठकीस प्रांताधिकारी डॉ.विजयानंद शर्मा, तहसीलदार दीपक पाटील,तालुका कृषी अधिकारी बाळासाहेब व्यवहारे, भाजपचे जिल्हाध्यक्ष सुरेश निकम, अद्वय हिरे, सुनील गायकवाड यांच्यासह विविध खात्यांचे प्रमुख आणि शेतकरी प्रतिनिधी उपस्थित होते. अतिवृष्टीमुळे पिकांचे नुकसान झाल्यास विमाधारक शेतकऱ्यांनी ७२ तासांच्या आत संबंधित विमा कंपन्यांना कल्पना देण्याचे बंधन असते. परंतु अनेकदा प्रयत्न करुनही कंपन्यांचा टोल फ्री क्रमांक लागत नाही. त्यामुळे विहित कालावधीत पिकांच्या नुकसान भरपाईची माहिती कंपन्यांना देता येत नाही. त्यामुळे पीक विमा भरपाईच्या नुकसानीपासून बहुसंख्य शेतकरी वंचित ठरण्याची भीती अनेक शेतकऱ्यांनी व्यक्त केली. काही शेतकऱ्यांना वेगवेगळ्या कारणांमुळे विमा कंपन्यांना नुकसानीबद्दल माहिती देणे शक्य होत नाही. परंतु अनेक शेतकऱ्यांनी कल्पना देऊनही त्यांच्या शेतात विमा कंपन्यांकडून पंचनामे होऊ शकले नसल्याची तक्रार यावेळी करण्यात आली.
हेही वाचा- नाशिक : वीज वापर नसताना शेतकऱ्याला २८ हजार रुपयांचे देयक
विमा कंपन्यांचे प्रतिनिधी पैशांची मागणी करतात
पिकांच्या नुकसानीचे पंचनामे करण्यासाठी विमा कंपन्यांचे प्रतिनिधी पैशांची मागणी करतात असा आरोप काही शेतकऱ्यांनी बैठकीत केला. तालुक्यातील सर्व गावांमध्ये यंदा ओला दुष्काळाची स्थिती असताना महसूल यंत्रणेने केवळ २२ गावांमध्ये पंचनामे करुन भरपाई देण्याचे जाहीर केले आहे. त्याबद्दलही बैठकीत नापसंती व्यक्त करण्यात आली. यंदा ओला दुष्काळामुळे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले ही वस्तुस्थिती असल्याने सर्वच शेतकऱ्यांचे पंचनामे करावेत, अशा सूचना खा.डाॅ.भामरे यांनी अधिकाऱ्यांना केल्या. या संदर्भात सरसकट नुकसान भरपाई देण्यासाठी राज्य शासनाकडे प्रयत्न केले जातील, असे आश्वासनही भामरे यांनी दिले.