दीपावलीनिमित्त विविध रंगांची उधळण सुरू झाली असली तरी या उत्सवाला सूरमयी साज चढविला जाणार आहे तो, दिवाळीत आयोजित मैफलींनीं. यासाठी शहर सज्ज झाले आहे. नेहमीप्रमाणे यंदाही दीपावली पाडवा, भाऊबीज, लक्ष्मी पूजन या दिवशीच्या कार्यक्रमांसाठी विविध सार्वजनिक मंडळे, संस्था व संघटनांनी पुढाकार घेतला आहे. त्यामुळे ही पहाट खऱ्या अर्थाने सूरमयी बनणार आहे. दिवाळी आणि संगीताची मैफल हे गेल्या काही वर्षांत अतूट बनलेले नाते यंदा अधिक दृढ होणार आहे.
नाशिकच्या सांस्कृतिक क्षितिजावर दरवर्षी अविस्मरणीय पाडवा पहाट फुलविणाऱ्या संस्कृती संस्थेतर्फे यंदा शुक्रवारी पहाटे ५ वाजता किराणा घराण्याचे गायक पं. कैवल्यकुमार गुरव यांचे शास्त्रीय गायन होणार आहे. त्यांना नितीन वारे तसेच मुंबई येथील हार्मोनियम वादक संगीत साथ करणार आहेत. दरम्यान, शिक्षण तसेच सामाजिक कार्यात उल्लेखनिय योगदान दिलेल्या बाळासाहेब गामणे यांना विशेष पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. नाशिककरांनी मैफलीस उपस्थित रहावे, असे आवाहन संस्कृती परिवाराच्या वतीने नगरसेवक शाहू खैरे यांनी केले आहे. गोदा श्रद्धा फाऊंडेशनतर्फे शुक्रवारी सायंकाळी ६ वाजता सांज पाडवा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. त्यामध्ये गायक अमेय दाते, जुईली जोगळेकर, नंदिनी गायकवाड, सोहम गोराणे, चैतन्य देवढे हे कलावंत सहभागी होणार आहेत. बॉईज टाऊन शाळेच्या मैदानावर हा कार्यक्रम होणार असल्याची माहिती फाऊंडेशनचे अध्यक्ष सुरेश पाटील यांनी दिली.
नसती उठाठेव मित्र परिवाराच्या वतीने लक्ष्मीपूजनच्या दिवशी म्हणजे गुरुवारी पहाटे ५.३० वाजता गंगापूर रोड येथील श्री संकटमोचन हनुमान मंदिर येथे दीपावली पहाट कार्यक्रमाचे आयोजन केले आहे.ग्वाल्हेर व जयपूर घराण्याच्या गायिका गौरी पाठारे यांचा गायनाचा कार्यक्रम होईल. त्यांना ऋग्वेद देशपांडे, ज्ञानेश्वर सोनवणे संगीत साथ करतील. पाठारे यांनी किराणा घराण्याचे पं. गंगाधरबुवा पिंपळखरे यांच्याकडे गायन शिक्षणाची सुरूवात केली. नंतर पं. अरूण द्रविड यांच्याकडे जयपूर घराण्याच्या गायकीचे शिक्षण घेत जयपूर, ग्वाल्हेर, किराणा या तिन्ही घराण्यातील गायकीचे सूक्ष्म बारकावे त्यांनी आत्मसात केले.
प्रमोद महाजन उद्यानात भाऊबीज पहाट
आमदार प्रा. देवयानी फरांदे आणि भाजपचे प्रवक्ते सुहास फरांदे यांच्या वतीने ‘भाऊबीज पहाट’चे आयोजन करण्यात आले आहे. पंडित आनंद भाटे तथा आनंद गंधर्व यांच्या स्वरांनी ही पहाट उजळणार आहे. शनिवारी पहाटे पाच वाजता गंगापूर रस्त्यावरील प्रमोद महाजन उद्यानात हा कार्यक्रम होईल. भारतरत्न पं. भीमसेन जोशी यांचे शिष्य आनंद भाटे नवीन पिढीचे किराणा घराण्याची परंपरा सांभाळणारे आश्वासक गायक आहेत. हिंदुस्थानी शास्त्रीय गायकीत त्यांनी आपला वेगळा ठसा उमटविला. लहानपणापासून त्यांनी गायनाचा प्रवास सुरू केला. सवाई गंधर्व संगीत महोत्सव, जितेंद्र अभिषेकी संगीत समारोह, सप्तक सांगीतिक महोत्सव यासारख्या महोत्सवांमध्ये आपली गायकी पेश करून असंख्य रसिकांची दाद मिळविली आहे. त्यांच्या गायन कलेत भजन, नाटय़गीत तसेच शास्त्रीय गायन, अभंग अशी विविधता आढळते. पं.आनंद भाटे यांना डॉ. प्रभा अत्रे, पं. संगमेश्वर गौरव आदी पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले. कार्यक्रमास नागरिकांनी उपस्थित रहावे, असे आवाहन फरांदे यांनी केले आहे.