वस्तू प्रदर्शन, विक्री महोत्सवात शीतल सांगळे यांचे मत

नाशिक : लहान गावातील महिलांनी बचत गट चळवळीला मोठय़ा शहरापर्यंत नेले आहे. नवे तंत्रज्ञान स्वीकारून या गटांची वाटचाल स्वावलंबनाकडे सुरू आहे. महिला बचत गट चळवळीत मोठय़ा प्रमाणात महिलांचा सहभाग अभिमानास्पद असून त्यामुळे त्यांचा आत्मविश्वास वाढत आहे, असे जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा शीतल सांगळे यांनी सांगितले.

येथील डोंगरे वसतिगृह मैदानावर महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानांतर्गत विभागीय आयुक्त कार्यालय आणि जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा यांच्या सहकार्याने विभागातील महिला स्वयंसहाय्यता बचत समूहांनी आणि ग्रामीण कारागिरांनी तयार केलेल्या वस्तुंचे प्रदर्शन आणि विक्री महोत्सवाचे उद्घाटन सांगळे यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाला पोलीस अकादमीच्या संचालक अश्वती दोरजे, उपायुक्त सुखदेव बनकर, प्रतिभा संगमनेरे, प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल लांडगे, समाज कल्याण सभापती सुनीता चारोस्कर, शिक्षण सभापती यतीन पगार आदी उपस्थित होते.

सांगळे यांनी बचत गटांमार्फत महिलांचे आर्थिक आणि सामाजिक सक्षमीकरण होत असल्याने महिला बचत गटांना प्रोत्साहन देऊन त्यांच्या वस्तूंना बाजारपेठ मिळवून देण्यासाठी गटांच्या मेळाव्यांचे आयेाजन हे उपयुक्त ठरणार असल्याचे सांगितले. महिला स्वयंसहाय्यता समूहांनी जुनी खाद्य संस्कृती टिकवली आहे. महिलांनी एकत्रित प्रयत्न करून या चळवळीला अधिक गती द्यावी आणि आपली आर्थिक उन्नती साधावी, असे आवाहनही त्यांनी केले. प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल लांडगे यांनी मेळाव्याच्या उद्देशाविषयी माहिती देत याव्दारे ग्रामीण वस्तूंची वाजवी दरात विक्री होऊन ग्राहक आणि बचत गटांचा फायदा होणार असल्याचे नमूद केले. तसेच महिला बचत गटांनी कुपोषण निर्मूलन, स्वच्छ पिण्याचे पाणी तसेच शौचालयाचा नियमित वापर होण्यासाठीही काम करण्याचे आवाहन केले. महाराष्ट्र पोलीस अकादमीच्या संचालक अश्वती दोरजे यांनी महिलांमध्ये परिवर्तनाची ताकद असून देश आणि राज्याच्या प्रगतीत महिलांचा सक्रिय सहभाग महत्त्वाचा असल्याचे सांगितले. महिलांनी संघटित होऊन ध्येयाकडे वाटचाल करायला हवी. बचत गटांच्या माध्यमातून महिलांचे कौशल्य बाहेर आल्यास त्यांचा आत्मविश्वास वाढेल आणि त्यांच्या कौटुंबिक परिस्थितीतही सुधारणा होईल. देशातील २८ टक्के महिला उत्पादन क्षेत्राशी संबंधित असून हे प्रमाण ३८  टक्क्य़ापर्यंत गेल्यास उत्पादनात ७०० अब्ज डॉलर्सची वाढ होईल, असे दोरजे यांनी नमूद केले. पोलीस कुटुंबातील महिलांना संधी मिळवून देण्यासाठी त्यांच्या गटाने तयार केलेल्या वस्तू प्रदर्शनात विक्रीसाठी  ठेवण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली.

विभागीय कार्यालयातील उपायुक्त सुखदेव बनकर यांनी बचतगट हे संस्कारपीठ होण्याची अपेक्षा व्यक्त केली. शासनाने बचत गटाच्या उत्पादनाला बाजार मिळवून देण्यासाठी ऑनलाइन सुविधा उपलब्ध करून दिली आहे. बचत गटांनी उत्पादनात नावीन्य आणून स्पर्धेसाठी सक्षम बनावे, असे आवाहन त्यांनी केले.

महोत्सवात दोनशे कक्ष

डोंगरे वसतिगृहावर मंगळवारपासून चार मार्चपर्यंत आयोजित या महोत्सवात प्राधान्याने नाशिक, धुळे, नंदुरबार, जळगाव, अहमदनगर या जिल्ह्य़ातील स्वयंसहाय्यता गटांद्वारे उत्पादित केलेली नावीन्यपूर्ण उत्पादने, कलाकुसरीच्या वस्तू, आयुर्वेदिक उत्पादने, वन औषधी, ग्रामीण हस्तकलेच्या, गृहोपयोगी वस्तू, खाद्यपदार्थ तसेच शासनाच्या विविध योजनांचे माहितीपर सुमारे दोनशे कक्ष उभारण्यात आले आहेत.

उद्घाटनास मंत्र्यांची अनुपस्थिती

प्रदर्शन आणि विक्री महोत्सवाचे उद्घाटन महिला बाल विभागाच्या मंत्री पंकजा मुंडे यांच्या हस्ते होणार होते. तसेच कार्यक्रमास पालकमंत्री गिरीश महाजन अध्यक्ष म्हणून उपस्थित राहणार होते. नियोजित अध्यक्ष तसेच प्रमुख पाहुणे उद्घाटन सोहळ्यास अनुपस्थित राहिल्याने जिल्हा परिषदेच्या अध्यक्षांच्या बळावर उद्घाटन सोहळ पार पडला.

Story img Loader