जळगाव : एकेकाळी कापसाच्या दराबाबत आंदोलन करणारे भाजपचे नेते गिरीश महाजन व शिवसेना शिंदे गटाचे नेते पालकमंत्री गुलाबराव पाटील हे आता शेतकर्यांच्या कापसाबाबत का बोलत नाहीत, असा प्रश्न करीत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते तथा आमदार अनिल पाटील यांनी, तर माजी मंत्री गुलाबराव देवकर यांनीही आता शिंगाडे मोर्चे काढणारे गेले कुठे, असा प्रश्न करीत जिल्ह्यातील दोन्ही मंत्र्यांवर जोरदार हल्लाबोल केला.
राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शेतकरी शेतकरी व सर्वसामान्यांच्या विविध मागण्यांचे निराकरण व्हावे या मागणीसाठी आंदोलन करण्यात आले. आंदोलनात पक्षाचे जिल्हाध्यक्ष अॅड. रवींद्र पाटील, आमदार अनिल पाटील, पक्षाचे नेते माजी मंत्री गुलाबराव देवकर, महानगराध्यक्ष अशोक लाडवंजारी, मंगला पाटील, सुशील शिंदे, रिकू चौधरी रिजवान खाटीक, इब्राहिम तड आदींसह पक्षाच्या विविध आघाड्यांचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी होते. यावेळी केंद्र व राज्य सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.
हेही वाचा >>> खडसे यांच्या स्वार्थीपणामुळेच जावई विनाकारण तुरुंगात; गिरीश महाजन यांचा आरोप
याप्रसंगी आमदार पाटील म्हणाले की, केंद्र सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे शेतकर्यांचा कापूसच घरात पडून आहे. खरेतर कापसाला प्रतिक्विंटल दहा ते बारा हजारांचा दर हवा होता. त्याच अपेक्षेने शेतकर्यांनी कापूस घरात ठेवला. केंद्र सरकारने चुकीचे धोरण राबवून ५१ लाख गाठी परदेशातून आयात केल्या. शेतकर्यांच्या जीवनात सोन्याचे दिवस आणून देणारे, सोन्यासारखे कापसाचे उत्पादन आज घरात पडून आहे. शेतकर्यांच्या कापसासाठी एकीकाळी गिरीश महाजन यांनी आंदोलने केली होती. त्या आंदोलनाच्या माध्यमातून आठ हजारांपेक्षा अधिक कापसाला भाव मिळाला पाहिजे, अशी त्यांनी सातत्याने मागणी केली होती. त्या आंदोलनात मीदेखील सहभागी झालो होतो. शेतकर्यांच्या प्रश्नांवर सभागृहात विरोधी पक्षाच्या माध्यमातून ओरडून ओरडून, तसेच अनेक प्रकारची आंदोलने करूनही सरकारला जाग येत नाही.
हेही वाचा >>> पंचवटीत गोळीबार करणाऱ्या टोळीवर मोक्का, शहर पोलिसांची गुन्हेगारांविरुध्द कठोर कारवाई
विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्या प्रयत्नातून सातत्याने आम्ही कर्तव्य म्हणून पार पाडले. मला वाटलं, येणार्या काळात मुख्यमंत्री निर्णय घेतील. मात्र, त्यांनी कापसाच्या दराबाबत बोलणेच टाळले आहे. पालकमंत्री स्वतः शेतकरीपुत्र असल्याकारणाने त्यांना शेतकर्यांच्या समस्यांची जाण असल्याचे आम्हाला वाटले होते. मात्र, या जिल्ह्यामध्ये दोन्ही मंत्र्यांच्या माध्यमातून शेतकर्यांच्या तोंडाला केवळ पाने पुसली गेले. जिल्ह्यातील प्रत्येक गावात शेतकर्यांकडे साठ टक्के अजूनही कापूस पडून आहे. तो तत्काळ खाली व्हायला हवा. आता सरकारने धोरण निश्चित करणे अपेक्षित आहे. जिनिंगमालकांशी तत्काळ बोलणी केली पाहिजे. जिल्ह्यातील दोन्ही मंत्र्यांकडून तसे प्रयत्न होत नाहीत. जिल्ह्यातील झोपलेल्या दोन्ही मंत्र्यांना जाग आणण्यासाठी हे निषेध आंदोलन करण्यात येत आहे. जिल्ह्यातील एकही बोंड शिल्लक न राहण्यासाठी दोन्ही मंत्र्यांनी शासनस्तरावर प्रयत्न करावेत, अशी मागणीही त्यांनी केली.
हेही वाचा >>> नाशिक: अनधिकृत शाळेप्रकरणी संस्थाचालकांवर गुन्हा
माजी मंत्री देवकर म्हणाले की, गुलाबराव पाटील हे विरोधात असताना शिंगाडे मोर्चे काढत होते. मात्र, आता सत्तेत मंत्री असताना ते शेतकर्यांच्या प्रश्नावर चूप आहेत. त्यांचे शिंगाडे मोर्चे आता कुठे गेले? सध्या शेतमालाचे भाव खालच्या पातळीवर आले आहेत. कापसाला सहा हजार रुपये भाव मिळत आहे. कांदाही शंभर ते दीडशे रुपये भावाने कोणी घेत नाही. केळीला भाव कमी आहे. एकूणच शेतमालाला अतिशय कमी भावामुळे शेतकरी राजा आर्थिक संकटात सापडला आहे. राज्यातील शेतकर्यांची अवस्था वाईट झाली आहे. असे असतानाही राज्य व केंद्र सरकारच्या मध्यमातून शेतकर्यांना दिलासा देण्यासाठी पाऊल उचलले जात नाही. तीन जूनला मुख्यमंत्री जिल्ह्यात येत आहेत. ते कशासाठी येताहेत तर सरकार आपल्या दारी असा त्यांनी नारा लावला आहे. मात्र, जगाचा पोशिंदा शेतकरी राजाच्या प्रश्नांबाबत मुख्यमंत्री एक शब्दही बोलत नाहीत. शेतकर्यांसाठी काय करणार आहेत, त्यासंदर्भातील भूमिकाही मुख्यमंत्री सांगत नाहीत, असा टोलाही त्यांनी मुख्यमंत्र्यांवर लगावला.