लोकसत्ता विशेष प्रतिनिधी
नाशिक: बीएड प्रवेशपूर्व ऑनलाईन परीक्षेसाठी आलेल्या १५० ते २०० विद्यार्थ्यांना ही परीक्षा राबविणाऱ्या कंपनीच्या नियोजनशून्य कारभाराने प्रचंड मनस्ताप सहन करावा लागला. प्रवेश पत्रावर बुधवारी सकाळी नऊ वाजता परीक्षेचा उल्लेख होता. त्यासाठी उत्तर महाराष्ट्रातील विविध भागातून परीक्षा केंद्रावर पोहोचलेल्या विद्यार्थ्यांना परीक्षा कालच म्हणजे मंगळवारी झाल्याचे सांगितले गेले. यामुळे एकच गोंधळ उडाला. याची माहिती मिळताच युवक काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी धाव घेऊन परीक्षेचे नियोजन करणाऱ्यांना धारेवर धरले. अखेर ही परीक्षा शहर आणि शहरालगतच्या अन्य महाविद्यालयात घेण्याचा तोडगा निघाला. पण तिथेही एका केंद्रात परीक्षेवेळी सर्व्हरने मान टाकल्याने विद्यार्थ्यांना अडचणींना तोंड द्यावे लागले.
हिरावाडीतील नाशिक इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी महाविद्यालयात बीएड प्रवेशपूर्व ऑनलाईन परीक्षेवेळी हा सावळागोंधळ उडाला. या परीक्षेसाठी धुळे, जळगाव, नंदुरबार जिल्ह्यातून विद्यार्थी मध्यरात्री, पहाटे नाशिकला पोहोचले. परीक्षा केद्रांवर सकाळी साडेआठ वाजता तुमची परीक्षा कालच झाल्यामुळे परत जाण्यास सांगण्यात आले. यामुळे विद्यार्थी चक्रावून गेले. मुळात, परीक्षेसाठी आलेल्या शेकडो विद्यार्थ्यांच्या प्रवेशपत्रावर बुधवारी सकाळी नऊ वाजता परीक्षा होईल, असे नमूद आहे. मग परीक्षा काल कशी झाली, अशी विचारणा काहींनी केली. युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष स्वप्निल पाटील हे देखील केंद्रावर पोहोचले. शिक्षक आमदार सत्यजित तांबे यांच्याशी संपर्क साधून परीक्षेतील गोंधळाची माहिती दिली गेली. रात्रभर २०० ते २५० किलोमीटरचा प्रवास करून विद्यार्थी परीक्षेसाठी आले होते. त्यांना परीक्षा न घेता परत पाठविणे अन्यायकारक आहे. प्रवेश पत्रावर दिलेल्या वेळापत्रकानुसार ते आले असून त्यात विद्यार्थ्यांची कुठलीही चूक नाही. या गोंधळास परीक्षेचे संचलन करणारी कंपनी जबाबदार असल्याची तक्रार करण्यात आली. या विद्यार्थ्यांची प्रवेश पत्रातील नियोजनाप्रमाणे परीक्षा घेण्याचा आग्रह धरण्यात आला.
आणखी वाचा- मनपा प्रवेशव्दाराला कुलूप लावणार, अधिकाऱ्यांना काळे फासणार- आमदार फारुक शहा यांचा इशारा
हा मुद्दा लावून धरल्यानंतर अखेर संबंधित कंपनी परीक्षा घेण्यास तयार झाली. त्यासाठी पुन्हा नव्या केंद्राची शोधाशोध करावी लागली. वडाळास्थित जेएमसीटी आणि गंगापूर धरण रस्त्यावरील जेआयटी या महाविद्यालयात ऑनलाईन परीक्षा घेण्याचे निश्चित झाले. हिरावाडीतील केंद्र आणि नवीन दोन्ही केंद्र यात बरेच अंतर आहे. बाहेरगावहून आलेल्या विद्यार्थ्यांसाठी बसची व्यवस्था करून त्यांना नव्या केंद्रावर पाठविले गेले. ११ वाजता दोन्ही केंद्रावर परीक्षा सुरू झाली. पण जेएमसीटी महाविद्यालयात मध्येच कंपनीचा सर्व्हर बंद पडला आणि पुन्हा ऑनलाईन परीक्षेत अडथळे आले. साडेबारा वाजता संबंधितांची परीक्षा पूर्ववत सुरू झाल्याचे सांगितले जाते.
गोंधळामुळे विद्यार्थ्यांना नाहक मनस्ताप सहन करावा लागला. धुळे, जळगाव आणि नंदुरबारमधून विद्यार्थी परीक्षेला आले होते. ऑनलाईन परीक्षेत वारंवार असे प्रकार घडत आहेत. पुन्हा तसे होऊ नये यासाठी शासनाने व्यवस्था निर्माण करणे गरजेचे आहे. बीएड प्रवेशपूर्व परीक्षेचे संचलन करणाऱ्या कंपनीवर कठोर कारवाई करण्याची मागणी युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष स्वप्निल पाटील यांनी केली.