नाशिक: शहरात डेंग्यूचा प्रादुर्भाव वाढत असताना महापालिका प्रभावीपणे उपाययोजना करत नसल्याची तक्रार करत काँग्रेसने मनपा आयुक्तांना डेंग्यूच्या डासाची प्रतिकृती देण्याचा प्रयत्न केला. तर शिवसेना ठाकरे गटाने आरोग्य विभागाला टाळे ठोकण्याचा इशारा दिला.

मे महिन्यात शहरात डेंग्यूचे ३३ रुग्ण आढळले होते. जून महिन्यात हा आकडा १६१ वर आणि जुलै महिन्यात तो २०० वर गेला. डासांच्या प्रादुर्भावामुळे डेंग्यूचा उद्रेक झाला असून या आजाराच्या विळख्यात लहान मुले, महिला मोठ्या प्रमाणात सापडत असून हा आकडा वाढत असल्याकडे काँग्रेसचे शहराध्यक्ष आकाश छाजेड यांनी लक्ष वेधले. शहरातील आरोग्य व्यवस्था डळमळीत झाली आहे. नियमित धुरळणी, फवारणी होत नसल्याने नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. पावसाच्या पाण्याचा निचरा होत नाही. कचरा व्यवस्थापनातील अभावामुळे डेंग्यूचा प्रादुर्भाव वाढत आहे. परिस्थितीचे गांभिर्य लक्षात आणून देण्यासाठी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी डेग्यूच्या डासाची प्रतिकृती मनपा आयुक्तांना देण्यासाठी आणली होती. परंतु, आयुक्तांनी ती स्वीकारण्यास नकार दिला.

हेही वाचा : पूजा खेडकर प्रकरणात सत्यता पडताळणी, राधाकृष्ण विखे यांचा दावा

महाविकास आघाडीतील ठाकरे गटही डेंग्यूच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे आक्रमक झाला आहे. डासांची उत्पत्ती वाढण्यास मनपा आरोग्य विभागातील निष्क्रिय अधिकारी जबाबदार असल्याचा आरोप करीत डेंग्यूला आळा घालण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना न राबविल्यास शिवसेना पध्दतीने आंदोलन छेडून आरोग्य खात्यात टाळे ठोकण्याचा इशारा ठाकरे गटाचे खासदार राजाभाऊ वाजे, जिल्हाप्रमुख सुधाकर बडगुजर, महानगरप्रमुख विलास शिंदे आदींनी दिला.

शहरात जुलैत डेंग्यू रुग्णांचा आकडा ५०० वर पोहोचल्याचे सांगितले जाते. परंतु, खरी आकडेवारी लपवली जात असल्याचा आरोप करण्यात आला. गोविंदनगर परिसरातील विनोद शर्मा आणि तेली या दोन रुग्णांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. डासांमुळे डेंग्यूच्या आजाराला निमंत्रण मिळते. त्याचा नायनाट करण्यासाठी औषध फवारणीची आवश्यकता आहे. मनपाचा वैद्यकीय व आरोग्य विभागाकडून प्रभावी उपाय केले जात नसल्याने डेंग्यूचा फैलाव झाला. संदर्भ सेवा रुग्णालयातून डॉ. तानाजी चव्हाण यांची मनपा वैद्यकीय, आरोग्य विभागात बदली करण्यात आली. संबंधितांनी वैद्यकीय विभागात या विभागाशी काहीही सबंध नसलेल्या दोन व्यक्तींना बसवले. हे दोघे सांगतील, त्यावर डॉ. चव्हाण स्वाक्षरी करतात. त्यांच्या दबावामुळे मनपाची वैद्यकीय यंत्रणा कोलमडून नाशिककरांचे आरोग्य धोक्यात आल्याचा आरोप निवेदनात करण्यात आला. महापालिका आयुक्त डाॅ. करंजकर यांच्याशी खासदारासंह ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी चर्चा केली.

हेही वाचा : नाशिक : गोदाम फोडून कपडे चोरणाऱ्या महिलांची टोळी जेरबंद

मविआला जाग

शहरात डेंग्यूचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत असताना इतके दिवस शांत बसलेल्या राजकीय पक्षांना अचानक जाग आली आहे. महाविकास आघाडीतील काँग्रेस आणि ठाकरे गट या दोन्ही पक्षांच्या पदाधिकाऱ्यांनी महापालिका आयुक्तांची भेट घेत या विषयावर त्वरीत उपाययोजना करण्याची मागणी केली. आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विरोधकांच्या हातात आरोग्यविषयक विषय हाती लागला आहे. यापुढेही हा विषय अधिक तापण्याची शक्यता आहे.