नाशिक : धुळे लोकसभा मतदारसंघात काँग्रेसने माजी राज्यमंत्री डॉ. शोभा बच्छाव यांना उमेदवारी दिल्याच्या निषेधार्थ डॉ. तुषार शेवाळे यांनी नाशिक जिल्हाध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यामुळे रिक्त झालेल्या पदावर पक्षाने प्रभारी जिल्हाध्यक्ष म्हणून चांदवडचे माजी आमदार शिरीष कोतवाल यांची नियुक्ती केली आहे. माजी जिल्हाध्यक्ष आणि पदाधिकाऱ्यांची नाराजी दूर केली जाईल, असे त्यांनी म्हटले आहे.
काँग्रेसचे प्रांताध्यक्ष नाना पटोले यांच्या मान्यतेने ही नियुक्ती करण्यात आली. धुळे लोकसभा मतदारसंघात भाजपने विद्यमान खासदार डॉ. सुभाष भामरे यांची उमेदवारी जाहीर करुन पाच आठवड्याचा कालावधी उलटल्यानंतर काँग्रेसने नाशिकच्या माजी राज्यमंत्री डॉ. शोभा बच्छाव यांना रिंगणात उतरविण्याचा निर्णय घेतला. डॉ. बच्छाव यांना पक्षातून विरोध झाला. त्यातूनच काँग्रेसचे नाशिक जिल्हाध्यक्ष डॉ. शेवाळे यांनी पदाचा राजीनामा दिला. धुळ्यातही तशीच स्थिती उद्भवली. डॉ. शेवाळे यांनी अडगळीत पडलेला बाहेरील चेहरा धुळ्यात उमेदवार म्हणून लादल्याचा आरोप पक्षश्रेष्ठींवर केला होता. जिल्हाध्यक्षांच्या आक्रमक भूमिकेमुळे निवडणूक काळात अडचणी वाढण्याची शक्यता लक्षात घेत पक्षाने तातडीने प्रभारी अध्यक्ष म्हणून माजी आमदार कोतवाल यांची नियुक्ती केली.
तिकीट एक आणि मागणारे दोन, अशी स्थिती असल्याने काहीअंशी नाराजी स्वाभाविक होती. परंतु, एकदा उमेदवारी जाहीर झाल्यावर सर्वांनी समन्वयाने काम करायला हवे. नाशिक आणि धुळे जिल्ह्यातील माजी अध्यक्षांची आपण स्वत: भेट घेऊन समजूत काढू. दोघेही काँग्रेसचे कट्टर कार्यकर्ते आहेत. आजवर अन्य पक्षांनी त्यांना आमिष दाखवूनही ते कुठेही गेले नाहीत. नेतेमंडळीही त्यांची समजूत काढून नाराजी दूर करतील, असा विश्वास नवनिर्वाचित प्रभारी जिल्हाध्यक्ष कोतवाल यांनी व्यक्त केला.
हेही वाचा…भाजपच्या डाॅ. हिना गावित यांच्या अडचणीत वाढ
मुळात सध्या शेतकरी, युवक, कामगार, मध्यमवर्ग, छोटे व्यापारी अशा सर्व घटकांमध्ये भाजप सरकार विरोधात कमालीचा रोष आहे. महागाई, बेरोजगारी, कृषिमालास मिळणारा अल्प भाव, जीएसटी आदी कारणांनी सामान्य नागरिक त्रस्तावला आहे. काँग्रेसकडून उमेदवारी देण्यास काहीअंशी विलंब झाला आहे. त्यामुळे प्रचाराच्या नियोजनार्थ मंगळवारी नाशिक येथील काँग्रेस कार्यालयात जिल्हास्तरीय पदाधिकाऱ्यांची बैठक बोलाविण्यात आली आहे. या बैठकीस माजी जिल्हाध्यक्ष डॉ. शेवाळे यांनाही निमंत्रित करण्यात आल्याचे कोतवाल यांनी सांगितले.