विश्व हिंदू परिषदेचा आरोप
मंदिर प्रवेशाचा मुद्दा करत भूमाता ब्रिगेडच्या तृप्ती देसाई केवळ प्रसिध्दी मिळविण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यांना राजकीय वलय असून त्यामागे अप्रत्यक्षरित्या काँग्रेस पक्ष सक्रिय असल्याचा आरोप विश्व हिंदू परिषदेने केला आहे. देसाई यांच्या कृतीने जनरोष उफाळून काही विघातक घडले तर सरकारवर दबाव आणता येईल असे षडयंत्र काही राजकीय पक्षांकडून सुरू असून प्रत्येक वेळी हिंदू धर्मालाच लक्ष्य का केले जाते, असा प्रश्नही विहिंपने उपस्थित केला आहे.
विश्व हिंदु परिषदेचे पश्चिम महाराष्ट्र प्रांत अध्यक्ष एकनाथ शेटे यांनी उपस्थित केला. राज्यात सध्या मंदिर प्रवेशासंदर्भात उठलेल्या वादंगाच्या पाश्र्वभूमीवर विहिंप आणि बजरंग दल यांच्या वतीने शुक्रवारी येथे विहिंपचे पश्चिम महाराष्ट्र प्रांताध्यक्ष एकनाथ शेटे यांची पत्रकार परिषद झाली. यावेळी शेटे यांनी तृप्ती देसाई यांच्यावर टिकास्त्र सोडले. देसाई २०११ मध्ये पुण्यातून काँग्रेसतर्फे निवडणूक लढल्या होत्या. त्यांची सामाजिक कारकीर्द निव्वळ राजकीय प्रसिध्दीपुरती मर्यादित आहे. आजवर कोणत्याच सामाजिक चळवळीशी त्या जोडल्या गेल्या नाहीत. त्यांनी अण्णा हजारे, रामदेव बाबा यांच्यासह अन्य काही लोकांसोबत ‘फोटोसेशन’ पुरते आपले सामाजिक कार्य मर्यादित ठेवले असल्याचा आरोप शेटे यांनी केला. . हिंदू धर्मात स्त्रियांना शक्ती तथा देवीचे स्थान दिले आहे. त्यामुळे स्त्री-पुरूष समानतेला महत्व देत प्रत्येक महिलेला मंदिरात प्रवेश दिलाच पाहिजे. पूजापाठ किंवा प्रवेशाबाबत लिंगभेद नसावा. मात्र याबाबत न्यायालय आणि आंदोलनकर्त्यांनी स्थानिकांशी चर्चा करावी. तेथील परंपरांचे महत्व लक्षात घेत कृती करावी असा सावध पवित्रा शेटे यांनी घेतला. न्यायालयाने कुठलाही निर्णय देण्याआधी राजकीय प्रसिध्दीसाठी केलेले उपक्रम हिंदू धर्माशी जोडून लोकांच्या धार्मिक भावना दुखावल्या जातील अशा हेतुपुरस्सर कृती करणाऱ्या लोकांना कडक शब्दांत समज द्यावी अशी मागणीही त्यांनी केली. आंदोलनातील आक्रमकता, सक्रियता ही सामाजिक कामासाठी वापरावी. आज आपल्यासमोर बारबालांचे पुनर्वसन, अनाथ मुलांचे संगोपन, विधवा महिलांचे पुनर्वसन, आदिवासी पाडय़ांवरील वंचितांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणणे असे सामाजिक प्रश्न आहेत. त्यासंदर्भातील उपक्रमांसाठी आंदोलनातील सक्रियता दाखवावी, असे आवाहनही त्यांनी केले. यावेळी जिल्हा मंत्री गणेश सपकाळ, अॅड. मिनल भोसले, बजरंग दलाचे जिल्हा संयोजक देविदास वारूंगसे आदी उपस्थित होते.
तृप्ती देसाईंमागे अप्रत्यक्षरीत्या काँग्रेस सक्रिय
मंदिर प्रवेशाचा मुद्दा करत भूमाता ब्रिगेडच्या तृप्ती देसाई केवळ प्रसिध्दी मिळविण्याचा प्रयत्न करत आहेत.
Written by लोकसत्ता टीम
First published on: 23-04-2016 at 03:12 IST
Nashik News (नाशिक न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Congress backing trupti desai says vhp