धुळे : प्रचंड महागाई वाढविणाऱ्या भाजपने देशातील जनतेचा विश्वासघात केला असल्याचा आरोप करुन सोमवारी धुळे जिल्हा काँग्रेस व शहर जिल्हा काँग्रेसच्या वतीने केंद्रातील भाजप सरकार आणि राज्यातील शिंदे-फडणवीस सरकारचा निषेध करण्यात आला. यासाठी सकाळी १० वाजेपासून प्रदेश काँग्रेसचे कार्याध्यक्ष आमदार कुणाल पाटील यांच्या नेतृत्वाखाली क्यूमाईन क्लबसमोर सत्याग्रह आंदोलन करण्यात आले. महागाई आणि बेरोजगारीच्या प्रश्नावर शासन घेई ना खबरदारी, कापूस-कांदा उत्पादक फिरे दारोदारी, सरकार शासन म्हणे आपल्या दारी, अशी परिस्थिती विदारक असल्याचे काँग्रेसने म्हटले आहे.
शेतकरी, कष्टकरी, कामगार, विद्यार्थी, व्यापारी, बेरोजगार यांच्या पदरी निराशा टाकून प्रचंड प्रमाणात महागाई वाढविणाऱ्या भाजपने देशातील जनतेचा विश्वासघात केला असल्याचा आरोप करण्यात आला. माजी खासदार बापूसाहेब चौरे, प्रदेश सचिव माजी आमदार डी. एस. अहिरे, युवराज करनकाळ,रणजित पावरा, रमेश श्रीखंडे यांच्या प्रमुख उपस्थितीत आणि धुळे जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष शामकांत सनेर, धुळे शहर जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष डॉ अनिल भामरे या पदाधिकाऱ्यांच्या सहभागातून सत्याग्रह आंदोलन करण्यात आले.