मालेगाव : धुळे लोकसभा मतदारसंघात भाजपने विद्यमान खासदार डॉ. सुभाष भामरे यांची उमेदवारी जाहीर करुन पाच आठवड्याचा कालावधी उलटल्यानंतर काँग्रेसने त्यांच्या विरोधात नाशिकच्या माजी राज्यमंत्री डॉ. शोभा बच्छाव यांना रिंगणात उतरविण्याचा निर्णय जाहीर केला. डॉ. बच्छाव यांच्या नावास पक्षातून विरोध होत आहे. त्यातूनच काँग्रेसचे नाशिक जिल्हाध्यक्ष डॉ. तुषार शेवाळे यांनी पदाचा राजीनामा दिला. अडगळीत पडलेला बाहेरील चेहरा धुळ्यात उमेदवार म्हणून लादल्याचा आरोप डॉ. शेवाळे यांनी पक्षश्रेष्ठींवर केला आहे. जिल्हाध्यक्षांच्या या आक्रमक भूमिकेमुळे काँग्रेसच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे.
मतदारसंघांच्या पुनर्रचनेनंतर २००९ पासून अस्तित्वात आलेल्या धुळे लोकसभा मतदारसंघात नाशिक जिल्ह्यातील मालेगाव मध्य, मालेगाव बाह्य आणि बागलाण हे तीन विधानसभा मतदारसंघ आणि धुळे जिल्ह्यातील धुळे शहर, धुळे ग्रामीण व शिंदखेडा हे तीन विधानसभा मतदार संघ समाविष्ट करण्यात आले आहेत. निवडणुकीसाठी भाजपकडून इच्छुकांची संख्या अधिक होती.
हेही वाचा…डॉ. शोभा बच्छाव यांच्या विरोधात काँग्रेस कार्यकर्त्यांची घोषणाबाजी
विद्यमान खासदार डॉ. सुभाष भामरे यांना तिसऱ्यांदा उमेदवारी देण्यास पक्षातील एका गटाचा तीव्र विरोध असतानाही भाजपने डॉ.भामरे यांच्यावर विश्वास दर्शवत पहिल्या यादीतच त्यांची उमेदवारी जाहीर करून टाकली. दुसरीकडे काँग्रेसमध्ये उमेदवारीसाठी फारशी स्पर्धा नव्हती. धुळे ग्रामीणचे आमदार कुणाल पाटील, नाशिक जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष डॉ.तुषार शेवाळे, धुळे जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष श्याम सनेर अशी मोजकीच इच्छुकांची नावे चर्चेत होती. त्यातही आमदार पाटील यांनी स्वतःच लोकसभा निवडणूक न लढवण्याची भूमिका जाहीर केल्याने फारशी स्पर्धा नसतानाही धुळ्यात काँग्रेसला उमेदवार जाहीर करण्यास उशीर झाला. चर्चेत असलेल्या इच्छुकांऐवजी ऐनवेळी डॉ. शोभा बच्छाव यांची उमेदवारी जाहीर करून एकप्रकारे धक्कातंत्राचा अवलंब केल्याचे दिसत आहे.
नाशिकस्थित डॉ. बच्छाव या माजी आरोग्य राज्यमंत्री असून काही काळ धुळे जिल्ह्याच्या पालकमंत्री म्हणून त्यांनी धुरा सांभाळली आहे. त्यांचे मूळ गाव हे मालेगाव तालुक्यातील सोनज तर, देवळा तालुक्यातील वाखारी हे माहेर आहे. मालेगाव, बागलाण आणि धुळे जिल्ह्यात त्यांचे नातेसंबंध आहेत. भाजप सरकार विरोधात शेतकऱ्यांची नाराजी पदोपदी जाणवत असून तिसऱ्यांदा उमेदवारी करत असल्याने डॉ. भामरे यांच्याविषयी काही प्रमाणात नकारात्मक वातावरण असल्याचेही चित्र आहे. या पार्श्वभूमीवर, डॉ.भामरे यांच्या विरोधात चांगली लढत देण्यासाठी एक नवा चेहरा म्हणून डॉ. बच्छाव यांच्या उमेदवारीवर काँग्रेसने शिक्कामोर्तब केले असण्याची शक्यता आहे. मात्र, या उमेदवारीस स्थानिक पातळीवरील काही काँग्रेस कार्यकर्त्यांनी विरोध करणे सुरू केले आहे. या उमेदवारीबद्दल पक्षश्रेष्ठींनी फेरविचार करावा, असा कार्यकर्त्यांचा आग्रह आहे.
हेही वाचा…उन्हाळी सुट्टीतही एसव्हीईईपी उपक्रमासाठी धडपड
धुळ्यात काँग्रेसच्या मोजक्या इच्छुकांमध्ये नाशिक जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष डॉ. तुषार शेवाळे यांचा समावेश होतो. २००९ पासून ते काँग्रेसकडून उमेदवारीसाठी प्रयत्न करत होते. प्रत्येक वेळी आपणास डावलण्यात आले, असा त्यांचा आक्षेप आहे. यावेळी उमेदवारी मिळण्याविषयी खूप आशावादी होते. त्यामुळे बुधवारी बच्छाव यांना उमेदवारी जाहीर झाल्यानंतर शेवाळे समर्थकांमध्ये नाराजी पसरली. या निर्णयाची प्रतिक्रिया म्हणून गुरुवारी काँग्रेस पक्ष कार्यालयात शेवाळे यांनी पत्रकार परिषद घेतली. पाच वर्षे पक्षाच्या जिल्हाध्यक्षपदाची धुरा सांभाळणाऱ्या शेवाळे यांनी परिषदेतच प्रदेशाध्यक्षांना ई-मेल द्वारा राजीनामापत्र पाठवून संताप व्यक्त केला. उपस्थित समर्थक पदाधिकारी व कार्यकर्त्यांनीदेखील राजीनामा देण्याचा इशारा दिला.
हेही वाचा…धुळ्यात भाजप, काँग्रेसमध्ये चुरशीची लढत ? शोभा बच्छाव यांच्या उमेदवारीनंतर जिल्हाध्यक्षांचा राजीनामा
धुळे मतदारसंघात काँग्रेसला अत्यंत अनुकूल वातावरण आहे. अशावेळी निवडून येण्याची क्षमता असणाऱ्या चांगल्या व्यक्तीस उमेदवारी देणे अपेक्षित होते. धुळे जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष श्याम सनेर किंवा आपल्या नावाचा त्यासाठी विचार होणे आवश्यक असताना बाहेरचा उमेदवार लादणे म्हणजे भाजपचा निवडणूक मार्ग सुलभ करून देण्यासारखे असल्याची टीका शेवाळे यांनी केली. भाजपचे भले करण्यासाठी काँग्रेसमध्ये काही व्यक्ती कार्यरत आहेत का, अशी शंका निर्माण होत असल्याचेही शेवाळे यांनी नमूद केले.