त्र्यंबकमध्ये शनिवारी रात्री निघालेल्या संदल मिरवणुकीतील काही युवकांनी त्र्यंबकेश्वर मंदिराच्या प्रवेशद्वाराजवळ फुले वाहून पायरीजवळ धूप दाखवण्याचा प्रयत्न केला. यावरुन महाराष्ट्रातील राजकीय वातावरण तापलं आहे. त्र्यंबक परिसरात तणावपूर्ण शांतता आहे. या प्रकरणावरून सत्ताधारी आणि विरोधी पक्षातील नेत्यांकडून प्रतिक्रिया दिल्या आहेत.

दरम्यान, काँग्रेसचे माजी खासदार हुसेन दलवाई यांनी त्र्यंबकेश्वर मंदिराला भेट दिली. त्यांनी मंदिराबाहेरून त्र्यंबकच्या राजाचं दर्शन घेतलं. यानंतर त्यांनी त्र्यंबकेश्वर मंदिराच्या बाहेर प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना भाजपावर अप्रत्यक्ष हल्लाबोल केला. “बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेली घटना संपवून त्यांना मनुस्मृती आणायची असेल तर हे देशाच्या विरोधातलं आहे,” अशी टीका दलवाई यांनी केली. शिवाय त्र्यंबकमध्ये ज्यांना दंगल घडवायची आहे, त्यांच्या बाजुने कुणीही नाही, असं म्हणत त्यांनी स्थानिक लोकांचे आभार मानले.

यावेळी हुसेन दलवाई म्हणाले, “ज्यांना इथे दंगल घडवायची आहे, त्यांच्या बाजुने कुणीही नाही. ज्यांच्याकडे देशाचे प्रश्न सोडवण्यासाठी काहीही उपाययोजना नाहीत. इथे बेकारांची संख्या वाढतेय. त्यांना नोकरी देण्यासाठी त्यांच्याकडे कोणतीही योजना नाही. त्यांच्याकडे शिक्षणासंदर्भात कोणतंही धोरण नाही. महागाईबाबत काहीही धोरण नाही. उपलब्ध असलेले उद्योग त्यांना अदाणींसारख्या उद्योगपतींच्या खिशात टाकायचे आहेत. तेच लोक दंगली घडवण्याचा प्रयत्न करत आहेत.”

“मी इथल्या लोकांचं कौतुक करायला आलो आहे. मी त्यांचं अभिनंदन करतो. हे सगळं घडूनही येथील लोक शांततेनं राहिले. मुस्लीम समाजाच्या बाजुने उभे राहिले, ही फार मोठी गोष्ट आहे. त्यांना या मंदिराचा आशीर्वाद असल्यामुळेच हे सगळं घडलं. मी मुस्लीम असूनही विठ्ठलाच्या दर्शनाला जातो. आम्हाला विठ्ठलही आमचा वाटतो,” असंही दलवाई म्हणाले.

हेही वाचा- सामाजिक एकोपा बिघडण्याची स्थानिकांना चिंता, त्र्यंबकेश्वर मंदिर प्रवेशप्रकरणी ‘एसआयटी’ चौकशी, चौघांवर गुन्हा

“त्यांना डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेली घटना संपवून मनुस्मृती आणायची असेल तर हे देशाच्या विरोधातलं आहे. हे सगळं रोखण्यासाठी देशात पुन्हा एकदा शिवाजी महाराजांनी जन्म घेणं आवश्यक आहे. महात्मा गांधी, महात्मा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि आमच्या साने गुरुजींनी पुन्हा जन्म घेणं आवश्यक आहे. तरच या देशात सलोखा कायम राहील. आमच्यासारख्या लोकांनी लोकांना एकत्र आणण्याचा प्रयत्न केला पाहिजे. मी देवाकडे प्रार्थना करेन की, इथल्या लोकांना फार मोठं आयुष्य दे… तणाव निर्माण झाल्यानंतरही येथील लोकांनी हिंदू-मुस्लीम सलोखा कायम ठेवून महाराष्ट्राला एक मार्ग दाखवला आहे, ही फार मोठी गोष्ट आहे,” असंही दलवाई यांनी नमूद केलं.

Story img Loader