नाशिक : सध्या देशात संविधानाची तोडफोड होत आहे. ती थांबावी आणि लोकशाही जिवंत रहावी यासाठी काँग्रेसने समविचारी पक्षांना एकत्रित घेत इंडिया गटाची स्थापना केली. याचा धसका भाजप आणि केंद्र सरकारने घेतल्याने आता पुन्हा एकदा भारताचा नारा दिला आहे, अशी टीका माजी मंत्री तसेच काँग्रेसचे ज्येष्ठ नेते चंद्रकांत हांडोरे यांनी केली आहे. जिल्ह्यात प्रदेश काँग्रेसच्या वतीने जनसंवाद पदयात्रा सुरू झाली आहे. पदयात्रेतील कार्यकर्त्यांना, पदाधिकाऱ्यांना हांडोरे यांनी मार्गदर्शन केले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

तत्पूर्वी येथे पत्रकारांशी संवाद साधताना हांडोरे यांनी केंद्र आणि राज्य सरकारला लक्ष्य केले. काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी वर्षभरापूर्वी कन्याकुमारी ते काश्मीर ही पदयात्रा पूर्ण केली. यात्रेमुळे लोकांच्या मनात राहुल गांधी यांची एक वेगळी प्रतिमा निर्माण झाली. या यात्रेच्या वर्धापन दिनानिमित्त राज्यात जनसंवाद पदयात्रा काढण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले. सध्या देशात महागाई, बेरोजगारी वाढली आहे. जाती जातींमध्ये द्वेष निर्माण केला जात असल्याचा आरोप हांडोरे यांनी केला.

हेही वाचा : आर्टिलरी सेंटर परिसरातून बिबट्या पिंजऱ्यात जेरबंद

सर्वसामान्यांना त्यांचे अधिकार मिळावेत, यासाठी राहुल गांधी यांनी आवाज उठविला. सर्व विरोधकांनी एकत्र येत इंडिया गट स्थापन केला आहे. राज्य तसेच केंद्र सरकारने याचा धसका घेतला. यासाठी भारताचा नारा देण्यात येत आहे. या पदयात्रेतून देशात लोकशाही, राज्यघटना अबाधित रहावी, महागाई कमी व्हावी, यासाठी सातत्याने आवाज उठविण्यात येईल. जनतेला आश्वासक सरकार देण्याचा आमचा प्रयत्न असल्याचे हांडोरे यांनी नमूद केले. पत्रकार परिषदेनंतर शहरातील पदयात्रेस आरंभ झाला.

Nashik News (नाशिक न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Congress leader chandrakant handore criticise bjp and central government concern about constitution css
Show comments