मालेगाव: काँग्रेस नेते खासदार राहुल गांधी यांची न्याय यात्रा बुधवारी नाशिक जिल्ह्यात दाखल होत आहे. या यात्रेच्या निमित्ताने मालेगाव शहरात ‘रोड शो’ तसेच चौक सभेचे आयोजन करण्यात येणार असून राहुल गांधी हे लोकांशी संवाद साधणार आहेत. शहरापासून १८ किलोमीटरवर असलेल्या सौंदाणे येथे रात्री एका शेतात राहुल गांधींसह यात्रेचा ताफा विसावणार आहे.
गुजरातमधून मंगळवारी न्याय यात्रा महाराष्ट्रात प्रवेश करणार आहे. नंदुरबार आणि धुळे जिल्ह्यातून न्याय यात्रेचा बुधवारी दुपारी अडीचच्या सुमारास झोडगे येथे नाशिक जिल्ह्यात प्रवेश होणार आहे. याठिकाणी जिल्हा काँग्रेसच्या वतीने त्यांचे भव्य स्वागत केले जाणार आहे. त्यानंतर दरेगावमार्गे ही यात्रा शहरात दाखल होईल. मालेगाव नवीन बस स्थानक परिसरात राहुल गांधी यांची चौक सभा होणार आहे. त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज पुतळामार्गे यात्रा सौंदाणे गावाकडे मार्गस्थ होईल. रात्री सौंदाणे शिवारातील एका शेतात या यात्रेचा मुक्काम राहणार आहे. त्यासाठी आठ एकर क्षेत्रात व्यवस्था करण्यात आली आहे.
हेही वाचा >>>नरेंद्र मोदी हे रामाचे व्यापारी; भारत जोडो न्याय यात्रेत जयराम रमेश यांची टीका
गुरुवारी सकाळी ही यात्रा चांदवडकडे रवाना होईल. सकाळी नऊ वाजता राहुल गांधी हे चांदवड येथे शेतकऱ्यांशी संवाद साधण्यासाठी मेळावा घेणार आहेत. या मेळाव्यास राष्ट्रवादी शरदचंद्र पवार काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हेही उपस्थित राहणार आहेत. मेळाव्यानंतर पिंपळगाव बसवंत, नाशिक आणि त्र्यंबकेश्वरमार्गे यात्रा ठाणे जिल्ह्यातील मोखाडा येथे मुक्कामास जाणार आहे. या यात्रेचे ठिकठिकाणी स्वागत करण्यासाठी जिल्हाभरातील काँग्रेस कार्यकर्ते सज्ज झाले आहेत.
यात्रेच्या नियोजनासाठी नाशिक जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष डॉ. तुषार शेवाळे तसेच पक्षाचे महानगर प्रमुख एजाज बेग यांच्या अध्यक्षतेखाली ग्रामीण व शहर भागातील कार्यकर्त्यांच्या स्वतंत्र बैठका पार पडल्या. आपल्या समस्या व गाऱ्हाणी राहुल गांधी यांच्याकडे मांडाव्यात, अशी शेतकरी तसेच अन्य घटकातील नागरिकांची इच्छा आहे. त्यासाठी संबंधित आणि राहुल गांधी यांची सौंदाणे येथे भेट घडवून आणण्याचा प्रयत्न असल्याचे काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष शेवाळे यांनी सांगितले.