नाशिक: जुनी निवृत्ती योजना लागू करावी, या मागणीकडे लक्ष वेधण्यासाठी शहर काँग्रेस आणि शिक्षक काँग्रेस विभागाच्यावतीने दिवाळीत पणत्या लावून आंदोलन करण्यात आले. सरकारच्या डोक्यात प्रकाश पडावा म्हणून पणती आंदोलन करण्यात आल्याचे काँग्रेसचे शहराध्यक्ष ॲड. आकाश छाजेड यांनी म्हटले आहे.
शहर काँग्रेसचे अध्यक्ष ॲड. छाजेड आणि माजी सभागृह नेते राजेंद्र बागूल, काँग्रेस शिक्षक विभागाचे अध्यक्ष विलास निकुंभ यांच्या नेतृत्वाखाली जुनी निवृत्ती वेतन योजना लागू करण्यासाठी हे आंदोलन करण्यात आले. यावेळी केंद्रातील भाजप व राज्यातील महायुती सरकारच्या धोरणांवर आंदोलकांनी आक्षेप घेतला. पणती आंदोलनाने सरकारच्या डोक्यात प्रकाश न पडल्यास पणतीची मशाल केली जाईल, असा इशारा त्यांनी दिला. जुन्या निवृत्ती वेतन योजनेसाठी काँग्रेसकडून लढा उभारला जाणार असल्याचे ॲड. छाजेड यांनी सूचित केले.
हेही वाचा… नाशिकमधील सिडकोत बिबट्याचा संचार; रहिवाशांमध्ये भीती
बागूल यांनी भाजप सरकारच्या भांडवलशाही धोरणावर टिकास्त्र सोडले. सर्वसामान्यांना जगणे मुश्किल झाले आहे. त्यामुळेच काँग्रेसचा समृद्ध काळ पुन्हा आणायचा आहे. शिक्षक विभागाचे अध्यक्ष निकुंभ यांनीही सरकारची धोरणे व कारभाराचा निषेध केला. यावेळी उल्हास सातभाई, आशाताई तडवी, शहर अल्पसंख्याक विभागाचे अध्यक्ष हनीफ बशीर, संदीप शर्मा, युवक काँग्रेसचे अध्यक्ष स्वप्निल पाटील, अनुसूचित जमाती विभागाचे अध्यक्ष संतोष ठाकूर, सातपूर ब्लॉकचे कैलास कडलक, जावेद इब्राहिम, इसाक कुरेशी आदी उपस्थित होते.