नाशिक : उत्तर प्रदेशातील हाथसर येथील युवतीवर अत्याचार आणि तिचा  खून करणाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी, या मागणीसाठी नाशिक शहर (जिल्हा) काँग्रेसतर्फे सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आले. या वेळी आंदोलनकर्त्यांनी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या पुतळ्याचे दहन केले.

पीडितेवर अंत्यसंस्कार करण्याचा हक्कही उत्तर प्रदेश पोलिसांनी तिच्या कुटुंबीयांना दिला नाही. हा गंभीर प्रकार दाबण्यासाठी कुटुंबीयांना विरोधी पक्षनेते तसेच प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींना

भेटू दिले नाही. योगी सरकारला कुठल्याही प्रकारे याची खंत वाटत नाही. हे प्रकरण बेजबाबदारपणे हाताळण्यात येत आहे. पीडित कुटुंबाला न्याय देण्याऐवजी त्यांना धमक्या देण्यापर्यंत सरकारची मजल गेली. पीडित कुटुंबाला न्याय मिळवून देण्यासाठी काँग्रेस पक्ष संघर्ष करत असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

हाथसर प्रकरणाची न्यायालयीन चौकशी करण्यात यावी, हाथसरच्या जिल्हाधिकाऱ्यांना निलंबित करा, पीडितेचा मृतदेह पोलिसांनी परस्पर पेट्रोल टाकून का जाळला, उत्तर प्रदेश प्रशासन दिशाभूल का करत आहे, पीडितेच्या कुटुंबाला धमक्या का दिल्या जात आहेत आदी प्रश्नांची योगी सरकारने उत्तरे द्यावीत, अशी मागणी काँग्रेसतर्फे  निवेदनात करण्यात आली.

या वेळी पक्षाचे शहराध्यक्ष शरद आहेर, जिल्हाध्यक्ष डॉ. तुषार शेवाळे तसेच इतर उपस्थित होते.  या वेळी योगी यांच्या प्रतीकात्मक पुतळ्याचे दहन करण्यात आले.

गांधी कुटुंबीयांना वाय दर्जाची सुरक्षा द्यावी

योगी सरकारने काँग्रेस खासदार राहुल गांधी, सरचिटणीस प्रियंका गांधी यांना हाथसरला जाताना अडवून धक्काबुक्की केली. काँग्रेस कार्यकर्त्यांवर लाठीहल्ला केला. महिलांबद्दल योगी आदित्यनाथ सरकारची मानसिकता काय हे यातून ठळकपणे अधोरेखित होत आहे. या सर्व प्रकाराची न्यायालयीन चौकशी करण्यात यावी, कुटुंबाला वाय दर्जाची सुरक्षा दिली पाहिजे, अशी मागणीही करण्यात आली.

Story img Loader