छबू नागरेमुळे प्रतिमा डागळली

महापालिका निवडणुकीत समविचारी पक्षांसमवेत आघाडी करण्याची तयारी दर्शविणाऱ्या काँग्रेसने राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्याशी संबंधित बनावट नोटांचे प्रकरण बाहेर आल्यानंतर या संदर्भात पुनर्विचार सुरू केला आहे. बनावट नोटा छपाई करणाऱ्या छबू नागरेमुळे राष्ट्रवादीची प्रतिमा डागाळली. त्यामुळे राष्ट्रवादीसमवेत आघाडी करावी की नाही, असा प्रश्न निर्माण झाल्याचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी सांगितले.

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पाश्र्वभूमीवर, सोमवारी विखे पाटील यांनी इच्छुकांच्या मुलाखती घेऊन जिल्ह्यातील स्थितीचा आढावा घेतला. स्थानिक पदाधिकाऱ्यांशी बैठक घेऊन चर्चा केली. नाशिक महापालिकेची निवडणूक लवकरच होत आहे. या निवडणुकीत काँग्रेस व राष्ट्रवादीमध्ये आघाडी करण्यावर जवळपास एकमत झाले होते. परंतु, राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांची एकेक प्रकरणे समोर येत असल्याने काँग्रेस सावध भूमिकेत आहे. विरोधी पक्षनेते विखे पाटील यांनी तसे सूचित केले. काही दिवसांपूर्वीच नाशिक पोलिसांनी एक कोटी ३५ लाख रुपयांच्या बनावट नोटा हस्तगत केल्या. त्या प्रकरणात राष्ट्रवादी युवक काँग्रेसचा माजी शहराध्यक्ष छबू नागरे, राष्ट्रवादीचा माजी पदाधिकारी तथा वादग्रस्त घंटागाडी ठेकेदार रामराव पाटील यांच्यासह एकूण ११ जणांना अटक झाली. या संदर्भात प्रश्न उपस्थित झाल्यावर विखे पाटील यांनी नागरेमुळे राष्ट्रवादीची प्रतिमा डागाळल्याचे नमूद केले. महापालिका निवडणुकीत राष्ट्रवादीशी युती करावी की नाही याविषयी पुनर्विचार सुरू आहे. काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांची काँग्रेसशी आघाडी न करण्याची मानसिकता असल्याचे विखे पाटील यांनी नमूद केले. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत समविचारी पक्षांशी युती करायची की नाही याचे अधिकार पक्षाने स्थानिक पदाधिकाऱ्यांना दिले आहेत. संबंधितांना राष्ट्रवादीशी आघाडी करावी असे वाटले नाही तर काँग्रेस पालिका निवडणुकीत स्वबळावर मैदानात उतरेल, असे संकेत या निमित्ताने मिळाले आहेत. दरम्यान, मागील काही महिन्यांत मनसे, राष्ट्रवादी व काँग्रेसच्या नगरसेवकांना आपल्याकडे खेचण्याची भाजप व शिवसेनेत स्पर्धा लागली आहे. त्यात सर्वाधिक नुकसान मनसे व राष्ट्रवादीचे झाले. त्यांच्या अनेक नगरसेवकांनी सेना वा भाजपमध्ये प्रवेश केला. स्थानिक पातळीवर राष्ट्रवादीशी युती करण्याविषयी काँग्रेसची सकारात्मक चर्चा आतापर्यंत झाली होती. मात्र, बनावट नोटांचे प्रकरण समोर आल्यानंतर काँग्रेसची मन:स्थिती बदलली आहे.