नाशिक – स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या कार्यकर्त्यांच्या असतात. त्यांना त्या लढण्याची संधी मिळायला हवी. कार्यकर्त्यांच्या मनातील संभ्रम आम्ही दूर केला असून नाशिकसह सर्व महापालिकांच्या निवडणुका काँग्रेसने स्वबळावर लढण्याचा निर्णय घेतला आहे, असे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी सांगितले. काँग्रेस ओबीसी विभागातर्फे रविवारी येथील औरंगाबाद रस्त्यावरील धनलक्ष्मी सभागृहात मंथन शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी पत्रकारांशी संवाद साधताना पटोले यांनी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका काँग्रेस महाविकास आघाडीसोबत लढणार असल्याचे सूचित केले. यावेळी त्यांनी महाराष्ट्रातून गुजरातला गेलेली वेदांताची गुंतवणूक, नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना अद्यापही न मिळालेली मदत, ओबीसी जनगणना, भारत जोडो यात्रा आदींवर भाष्य केले. भाजप हा अतिशय प्रबळ पक्ष असल्याचे चित्र प्रसार माध्यमांतून रंगविले जाते. परंतु, लोकशाहीतील तो सर्वात कमकुवत पक्ष असून भय व भ्रष्टाचारावर ते राजकारण करीत असल्याचा आरोप त्यांनी केला. देशातील महागाई, भ्रष्टाचार, बेरोजगारी आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नांना केवळ काँग्रेसच योग्य प्रकारे न्याय देऊ शकते. त्यामुळे काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली निघालेल्या भारत जोडो यात्रेला उत्स्फुर्त प्रतिसाद मिळत आहे. देशात वा राज्यात कोणाची सत्ता आहे, त्याला महत्व नाही. महागाईने सामान्य माणूस होरपळून निघाला आहे. प्रसारमाध्यमांनी जनतेच्या प्रश्नांवर प्रकाशझोत टाकायला हवा, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
हेही वाचा >>> राज ठाकरे सगळ्या क्षेत्रातील तज्ज्ञ कलाकार – नितीन गडकरींकडून जाहीर स्तुती
अतिवृष्टीमुळे राज्यात पिकांचे मोठे नुकसान झाले. गणेशोत्सवात राज्य शासनाने नुकसानग्रस्तांच्या मदतीसाठी तीन हजार कोटींची घोषणा केली होती. मात्र, अद्याप ती रक्कम शेतकरी दूर पण, जिल्हाधिकाऱ्यांकडे देखील पोहोचली नाही. शिंदे-फडणवीस सरकार शेतकरी विरोधी धोरण राबवित असल्याचा आरोप त्यांनी केला. केंद्रातील मोदी सरकारने ओबीसींबाबत तोच कित्ता गिरवला. राज्यात ओबीसी आरक्षणाचा प्रश्न निर्माण झाल्यावर केंद्राने ओबीसींची माहिती देण्यास नकार दिला होता. त्यामुळे शासनाला बांठिया आयोगाची स्थापना करावी लागली. या आयोगाने आडनावांच्या आधारे राज्यातील ओबीसींची संख्या गृहीत धरली. त्यामुळे तो अहवाल काँग्रेसला मान्य नाही. केंद्र सरकारने जातीनिहाय जनगणना करावी, असा ठराव मांडला जाणार आहे.
हेही वाचा >>> “नितीन गडकरी जे काही करतात ते ‘वरून’च करतात, आमचं जुळतं कारण…”; राज ठाकरेंचं नागपुरात विधान!
ओबीसी मतांसाठी भाजपकडून पंतप्रधान नरेंद्र मोदी हे ओबीसी असल्याचे सांगितले जाते. मात्र मोदी हे ओबीसी नसल्याचे काँग्रेसचे गुजरातमधील माजी विरोधी पक्षनेते शक्तीसिंग गोहिल यांच्याकडे सर्व कागदपत्रे आहेत. ते प्रत्येक राज्यात पत्रकार परिषदेत कागदोपत्री पुरावे मांडणार असून त्यातून खरे-खोटे स्पष्ट होईल, असे पटोले यांनी सांगितले. महाराष्ट्रात प्रस्तावित वेदांता समुहाचा दीड लाख कोटींच्या गुंतवणुकीचा प्रकल्प गुजरातला निघून गेला. त्यातून लाखो स्थानिक युवकांना रोजगार मिळाले असते. परंतु, राज्यातील भाजपप्रणित इडी सरकारने इतका मोठा प्रकल्प गुजरातला पाठवून दिला. राज्यकर्ते महाराष्ट्राची लूट करून सर्व काही गुजरातला देत असून उद्या मुंबई गुजरातला दिली तरी आश्चर्य वाटणार नाही. राज्यकर्त्यांना महाराष्ट्रापेक्षा गुजरातचा पुळका का. असा प्रश्न करीत त्यांच्या नोकऱ्या जातील, ही भीती असल्याने संबंधितांकडून गुजरात म्हणजे पाकिस्तान नव्हे, अशी विधाने केली जात असल्याचा टोला पटोले यांनी लगावला. राज्यातील उद्योग महाराष्ट्रातच असायला हवेत. ते गुजरातला जाता कामा नये, ही काँग्रेसची भूमिका असल्याचे त्यांनी सांगितले.