नाशिक – स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या कार्यकर्त्यांच्या असतात. त्यांना त्या लढण्याची संधी मिळायला हवी. कार्यकर्त्यांच्या मनातील संभ्रम आम्ही दूर केला असून नाशिकसह सर्व महापालिकांच्या निवडणुका काँग्रेसने स्वबळावर लढण्याचा निर्णय घेतला आहे, असे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी सांगितले. काँग्रेस ओबीसी विभागातर्फे रविवारी येथील औरंगाबाद रस्त्यावरील धनलक्ष्मी सभागृहात मंथन शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी पत्रकारांशी संवाद साधताना पटोले यांनी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका काँग्रेस महाविकास आघाडीसोबत लढणार असल्याचे सूचित केले. यावेळी त्यांनी महाराष्ट्रातून गुजरातला गेलेली वेदांताची गुंतवणूक, नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना अद्यापही न मिळालेली मदत, ओबीसी जनगणना, भारत जोडो यात्रा आदींवर भाष्य केले. भाजप हा अतिशय प्रबळ पक्ष असल्याचे चित्र प्रसार माध्यमांतून रंगविले जाते. परंतु, लोकशाहीतील तो सर्वात कमकुवत पक्ष असून भय व भ्रष्टाचारावर ते राजकारण करीत असल्याचा आरोप त्यांनी केला. देशातील महागाई, भ्रष्टाचार, बेरोजगारी आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नांना केवळ काँग्रेसच योग्य प्रकारे न्याय देऊ शकते. त्यामुळे काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली निघालेल्या भारत जोडो यात्रेला उत्स्फुर्त प्रतिसाद मिळत आहे. देशात वा राज्यात कोणाची सत्ता आहे, त्याला महत्व नाही. महागाईने सामान्य माणूस होरपळून निघाला आहे. प्रसारमाध्यमांनी जनतेच्या प्रश्नांवर प्रकाशझोत टाकायला हवा, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा