मालेगाव : धुळे लोकसभा मतदारसंघात काँग्रेसने डॉ. शोभा बच्छाव यांना उमेदवारी जाहीर केल्याने नाराज झालेल्या स्थानिक कार्यकर्त्यांच्या रोषाला बच्छाव यांना सामोरे जावे लागले. गुरुवारी बच्छाव या येथील काँग्रेस पक्ष कार्यालयात दाखल झाल्या असता कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी करून बच्छाव यांच्या उमेदवारीस कडाडून विरोध केला.
धुळ्यात काँग्रेसकडून उमेदवारीसाठी धुळे जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष शाम सनेर, नाशिक जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष डॉ. तुषार शेवाळे हे प्रमुख दावेदार होते. या दोघांनाही टाळून काँग्रेसने नाशिकच्या माजी राज्यमंत्री डॉ. शोभा बच्छाव यांना उमेदवारी जाहीर केली. बच्छाव यांच्या रूपाने परका उमेदवार दिल्याची कार्यकर्त्यांची भावना आहे. या उमेदवारीवरून नाशिक आणि धुळे जिल्ह्यात काँग्रेसमध्ये नाराजी पसरली. काँग्रेसचे नाशिक जिल्हा अध्यक्ष डॉ. शेवाळे आणि धुळे जिल्हा अध्यक्ष सनेर यांनी बच्छाव यांच्या उमेदवारीला विरोध म्हणून राजीनामे दिले आहेत.
हेही वाचा – उन्हाळी सुट्टीतही एसव्हीईईपी उपक्रमासाठी धडपड
या पार्श्वभूमीवर बच्छाव यांनी येथील काँग्रेस कार्यालयास भेट दिली. यावेळी उपस्थित कार्यकर्त्यांनी बच्छाव यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. आपण स्वतः धुळ्यात उमेदवारी मागितली नाही, मात्र पक्षाने आदेश दिल्यामुळे आपल्याला उमेदवारी स्वीकारावी लागल्याचे बच्छाव यांनी सांगितले. नाराज कार्यकर्त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्नही केला. मात्र कार्यकर्ते आपल्या भूमिकेवर ठाम राहिले. आपण उमेदवारी करू इच्छित नाही, अशी भूमिका पक्षश्रेष्ठींकडे कळवून शेवाळे यांना उमेदवारी द्यावी, अशी शिफारस पक्षाकडे करावी, असा आग्रह कार्यकर्त्यांनी बच्छाव यांच्याकडे धरला. नाराज कार्यकर्ते ऐकण्याच्या मनस्थितीत नसल्याचे लक्षात आल्यावर अखेर बच्छाव यांना काँग्रेस कार्यालयातून काढता पाय घ्यावा लागला.