नाशिक – नाशिक-त्र्यंबकेश्वर मार्गाच्याविस्तारीकरणात भूसंपादनाच्या अडचणी येऊ शकतात. त्यामुळे एका मार्गावर अवलंबून न राहता आणि या मार्गावरील वाहतुकीचा ताण कमी करण्यासाठी इगतपुरी-घोटी-पहिणे-पेगलवाडी या पर्यायी मार्गावर विचार होत आहे. त्र्यंबकेश्वरकडे येणाऱ्या अन्य मार्गावर त्यादृष्टीने नियोजनाची शक्यता आहे. रामकुंड परिसरातील तीन-चार लहान पुलाचे संरचनात्मक परीक्षण केले जाईल. त्याआधारे हे पूल काढायचे, ठेवायचे की त्यांचे मजबुतीकरण करायचे, यावर निर्णय घेतला जाणार आहे.
त्र्यंबकेश्वरनंतर प्रशासकीय अधिकाऱ्यांनी गुरुवारी शहरात कुंभमेळ्याच्या पूर्वतयारीच्या दृष्टीने पाहणी केली. विभागीय महसूल आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम, जिल्हधिकारी जलज शर्मा, मनपा आयुक्त मनिषा खत्री, पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांच्यासह सर्व विभागांचे प्रमुख यांनी सिटीलिंक बसमधून दौरा केला. पाहणीनंतर विभागीय आयुक्त डॉ. गेडाम यांनी माहिती दिली.
सिंहस्थ कुंभमेळ्याच्या दृष्टीने प्रस्तावित रस्ते ऑगस्ट २०२७ पर्यंत पूर्णत्वास नेण्याचे निश्चित केले आहे. प्रशासकीय यंत्रणेने कुंभमेळ्यासाठी आवश्यक आणि दोन वर्ष लागणारी कामे, एक ते दीड वर्ष लागणारी कामे अशी वर्गवारी केली. सिंहस्थाच्या मोठ्या कामांच्या निविदा पुढील दोन, तीन महिन्यात काढून त्यांना सुरुवात केली जाईल, असे त्यांनी सांगितले.
रामकुंड काँक्रिटीकरणमुक्तीसाठी अभ्यास
गोदावरीतील रामकुंड काँक्रिटमुक्त केल्यास पाणी जमिनीत झिरपून ते कोरडेठाक होईल की जमिनीतील झऱ्यांमधून कुंडात नवीन पाणी येईल, हा प्रश्न प्रशासकीय यंत्रणेला पडला आहे. त्यामुळे या संदर्भात शास्त्रीय अभ्यास करण्याचा विचार आहे. रामकुंड व परिसरातील कुंड काँक्रिटमुक्त करण्याचा विषय अनेक वर्षांपासून प्रलंबित आहे. कॉक्रिट काढल्यास रामकुंडात पाणी राहील की ते कोरडेठाक होईल, यासंदर्भातील तांत्रिक अभ्यासाची गरज गेडाम यांनी मांडली. कॉक्रिट काढल्यास मातीत भाविकाचा पाय घसरून आपत्तीला नियंत्रण मिळू शकते. शिवाय रामकुंडात अस्थिविसर्जन होते. धार्मिक आस्थेशी जोडलेला हा विषय आहे. त्यामुळे सर्व घटकांशी चर्चा करून सर्वसंमतीने निर्णय होईल, असे डॉ. गेडाम यांनी सूचित केले.