नाशिक : नायलाॅन मांज्यामुळे होणारे अपघात लक्षात घेत पोलीस आयुक्तांच्या आदेशाने आयुक्तालय हद्दीत ७४ नायलॉन मांजा विक्रेत्यांविरुध्द प्रथमच हद्दपारीची कारवाई करण्यात आली आहे. मकरसंक्रांतीला शहरासह जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात पतंगबाजी केली जाते. संक्रांतीला अजून काही दिवसांचा अवधी असतानाही पतंगप्रेमी पतंगी उडवू लागले आहेत. काही जणांकडून पतंगींसाठी नायलॉन मांजाचा वापर केला जातो. नायलाॅन मांजामुळे पशु, पक्षी, मानवी जिविताला होणारी हानी पाहता नायलॉन मांजावर बंदी आणण्यात आली असली तरी काही जणांकडून चोरुन नायलाॅन मांजाची विक्री केली जात आहे.
नायलाॅन मांजाचा वापर आणि विक्री रोखण्यासाठी पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांच्या आदेशानुसार नायलॉन मांजा निर्मिती, विक्री, खरेदी, वापर, साठा करण्यावर मनाई आदेश काढण्यात आले आहेत. नायलॉन मांजा न वापरण्याविषयी जनजागृती करण्यात येत आहे. असे असतानाही काही व्यावसायिकांकडून नायलॉन मांजाची विक्री सुरू आहे.
हेही वाचा…सिंहस्थ कुंभमेळा आराखडा अंतिम करण्याची गरज, सुजाता सौनिक यांची सूचना
नागरिकांकडून प्राप्त तक्रारींनुसार पोलीस ठाण्याकडील पथक तसेच गुन्हे शाखेकडील पथकाच्या वतीने शोध घेत त्यांच्यावर कारवाई करण्यात आली. नायलॉन मांजा बाळगणाऱ्या ३२ जणांविरुध्द गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. परिमंडळ (एक) अंतर्गत आडगाव येथे एक, पंचवटी परिसरात चार, म्हसरूळ परिसरात पाच, भद्रकाली परिसरात सहा, सरकारवाडा येथे एक, मुंबईनाका येथे आठ तसेच परिमंडळ दोन हद्दीत नाशिकरोड येथे चार, देवळाली कॅम्प येथे तीन, उपनगर येथे सात, इंदिरानगर येथे १२, सातपूर येथे सात, अंबड येथे १२ तसेच चुंचाळे येथील एमआयडीसी परिसरात चार याप्रमाणे ७४ जणांविरुध्द हद्दपारीची कारवाई करण्यात आली आहे. नाशिक आयुक्तायात प्रथमच नॉयलॉन मांजा विक्रेत्यांवर हद्दपारीची कारवाई करण्यात आली.
हेही वाचा…नववर्षाचे नंदुरबारमध्ये विद्यार्थ्यांकडून सामूहिक सूर्यनमस्काराव्दारे स्वागत
यापुढेही ही कारवाई सुरू राहील, असा इशारा पोलीस आयुक्त कर्णिक यांनी दिला आहे. गुन्हे शाखेकडील व पोलीस ठाण्याकडील पथकांकडून देखरेख ठेवण्यात येऊन हद्दपार केलेल्या व्यक्ती शहरात आढळल्यास त्यांच्याविरूध्द कारवाई करण्याचा इशारा देण्यात आला आहे.